"जहां-जहां पडे कदम, वहा..."; राहुल-प्रियांका यांनी किती सभा घेतल्या माहीतेय? तरी उघडू शकलं नाही काँग्रेसचं खात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:14 IST2025-02-08T18:14:07+5:302025-02-08T18:14:57+5:30
Delhi Assembly Election Results 2025: या निवडणुकीत आम आदमी पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागत आहे. भाजप दणदणीत विजयासह दिल्लीत सरकार स्थापन करताना दिसत आहे. तर काँग्रेस खातेही उघडू शकलेला नाही.

"जहां-जहां पडे कदम, वहा..."; राहुल-प्रियांका यांनी किती सभा घेतल्या माहीतेय? तरी उघडू शकलं नाही काँग्रेसचं खात!
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या काँग्रेस खासदार प्रियंका वाड्रा यांनी जोरदार प्रचार केला होता. आज (शनिवार, ८ फेब्रुवारी) निवडणुकीचे येत असलेले निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. आम आदमी पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागत आहे. भाजप दणदणीत विजयासह दिल्लीत सरकार स्थापन करताना दिसत आहे. तर काँग्रेस खातेही उघडू शकलेला नाही.
आता या निकालांनंतर प्रश्न असा निर्माण झाला आहे की, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचार करूनही काँग्रेसच्या वाट्याला केवळ निराशाच आली. काँग्रेससाठी अत्यंत खराब निकाल आला. महत्वाचे म्हणजे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी जेथे जेथे सभा घेतल्या तेथे तेथे काँग्रेसचा पराभव झाला, काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही, असे चित्र आहे.
केव्हापासून सुरू केला होता प्रचार? -
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी 13 जानेवारी, 2025 पासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. त्यांनी सर्वप्रथम वायव्य दिल्लीत पाच जागांवर सभा घेतल्या. यानंतर त्यांनी जानेवारीच्या शेवटी म्हणजे, 28 ते 30 जानेवारी दरम्यान उत्तरी दिल्लीत सर्वाधिक म्हणजेच आठ सभा केल्या. याशिवाय नैऋत्य दिल्लीत सात सभा केल्या. तसेच, प्रियांका गांधी यांनी 31 जनवरीला पश्चिमी दिल्लीत सात सभा घेतल्या. यानंतर 1 फेब्रुवारीला सेंट्रल दिल्लीत 7 सभा घेतल्या. यानंतर, शाहदरामध्ये 5 सभ केल्या. राहुल गांधी प्रियंका गांधी वाड्रा या दोघांच्या एकूण सभांचा विचार करता, या दोघांनी एकूण 58 सभा केल्या.
कुणी किती जागांवर सभा घेतल्या? -
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या या सभांदरम्यान, काँग्रेस नेत्यांनी मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या बाजूने हवा निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. काँग्रेसच्या प्रचाराचा विचार करता राहुल गांधी यांनी एकूण ३४ जागांवर जाहीर सभा घेतल्या होत्या. तर प्रियांका गांधी यांनी २४ जागांवर जाहीर सभा घेतल्या होत्या.