लवकरच होणार दिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा! अमित शाहांच्या घरी महत्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 14:28 IST2025-02-09T14:28:12+5:302025-02-09T14:28:21+5:30
Delhi Assembly Election Result 2025: 27 वर्षांनंतर भाजपने दिल्लची सत्ता काबीज केली. आता मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लवकरच होणार दिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा! अमित शाहांच्या घरी महत्वाची बैठक
Delhi Assembly Election Result 2025: काल, म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. तब्बल 27 वर्षांनंतर राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार स्थापन झाले आहे. दिल्लीतील 70 पैकी 48 जागा भाजपल्या मिळाल्या, तर आपला फक्त 22 जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, भाजपच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दिल्लीत सरकार स्थापनेबाबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत जेपी नड्डा, बैजयंत पांडा आणि बीएल संतोषसारखे पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीपदासाठीच्या नावांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्ली भाजपाध्यक्ष आमदारांची भेट घेणार
मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आज संध्याकाळी सर्व विजयी आमदारांची भेट घेणार आहेत. यादरम्यान ते सर्वांचे अभिनंदन करतील आणि सरकार स्थापनेबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शनिवारी संध्याकाळी भाजपच्या कार्यालयात पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शहा यांच्यासोबत शपथविधी आणि दिल्लीत स्थापन होणाऱ्या सरकारची रूपरेषा यावर चर्चा झाली.
पीएम मोदींच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठरणार
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 14 फेब्रुवारीच्या रात्री पंतप्रधान मोदी परतणार आहेत. त्यानंतरच दिल्लीत शपथविधी होऊ शकतो. हा शपथविधी सोहळा भव्य असेल. यामध्ये एनडीएच्या नेत्यांचा सहभाग अपेक्षित आहे. याशिवाय एनडीए शासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही बोलावण्यात येणार आहे.
आतिशी यांचा राजीनामा
विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा (आप) दारुण पराभव झाल्याच्या एका दिवसानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी रविवारी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. पक्षाचा दारुण पराभवाला झाला असला तरी, आतिशी कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती यांच्यासह अनेकांचा पराभव झाला आहे.