दिल्लीमध्ये भाजपा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न देताच लढणार, रणनीती की अपरिहार्यता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 23:50 IST2024-12-20T23:50:16+5:302024-12-20T23:50:19+5:30
Delhi Assembly Election 2025:

दिल्लीमध्ये भाजपा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न देताच लढणार, रणनीती की अपरिहार्यता?
दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर देशातील बहुतांश राज्यात आपली सत्ता प्रस्थापिक केली आहे. मात्र देशाच्या राजधानीचं क्षेत्र असलेल्या दिल्लीमध्ये भाजपालाआपलं सरकार सत्तेत आणता आलेलं नाही. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव केला होता. त्या पार्श्वभूमीवर २०२५ च्या सुरुवातीला होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न देण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याची चर्चा आहे.
केंद्रातील सत्ता मिळवली तरी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीची सत्ता मात्र भाजपाला तब्बल १९९८ पासून मिळवता आलेली नाही. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा दिल्लीत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र तेव्हा भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी काही जागा कमी पडल्या होत्या. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यासह सरकार स्थापन केलं होतं. तर २०१५ आणि २०२० मध्ये आम आदमी पक्ष निर्विवाद विजय मिळवून दिल्लीच्या सत्तेत आला होता.
मागच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने दिल्लीत प्रत्येक चाल खेळून पाहिली आहे. पण त्यांना यश आलेलं नाही. २०१५ मध्ये किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करून भाजपाने निवडणूक लढवली होती, पण त्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. तसेच किरण बेदी ह्याही पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर २०२० मध्ये भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे न करता मोदींच्या नेतृत्वाच्या नावावर निवडणूक लढवून पाहिली. मात्र त्यातही भाजपाला अपयश आले.
आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्यासमोर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न देता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविना लढण्याचा भाजपाचा निर्णय हा एका विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीचा भाग असल्याचं बोललं जात आहे. सद्यस्थितीत दिल्लीच्या राजकारणात अरविंद केजरीवाल यांना आव्हान देऊ शकेल, असा लोकप्रिय चेहरा आपल्याकडे नाही, असे भाजपाला वाटत आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कुठलाही चेहरा समोर न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा समोर करण्याचा विचार भाजपाकडून करण्यात येत आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यासमोर कुठलाही चेहरा पुढे करण्यापेक्षा मोदींचं नाव आणि त्यांच्या कामावर निवडणूक लढवणं फायदेशीर ठरेल, असं भाजपाच्या नेत्यांना वाटतं. तसेच दुसऱ्या राज्यातून एखादा लोकप्रिय चेहरा आणून त्याच्या नावावर निवडणूक लढवण्याचा विचारही भाजपाने करून पाहिलाय. १९९८ मध्ये काँग्रेसने अशीच खेळी करत शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करून निवडणूक लढवली होती. त्यानंतर शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून जवळपास १५ वर्षे काम पाहिलं होतं. मात्र भाजपाच्या बाबतीत बाहेरून नेतृत्व आणलं गेल्यास अशा नेत्याचे स्थानिक नेत्यासोबत सूर जुळतील का? हाही प्रश्न आहे.