दिल्लीच्या मनात काय? पुढील 5 वर्षांसाठी दिल्लीतील जनता कुणाला सत्तेपर्यंत पोहोचवणार आणि कुणाला विरोधात बसवणार? या प्रश्नाचे उत्तर 8 तारखेला मिळेलच. या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात अगदी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेस पक्षही संपूर्ण ताकदीनिशी उतरला होता. दरम्यान सी व्होटरने आपल्या ट्रॅकरच्या सहाय्याने दिल्लीतील जनेतेचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
"आपली, सरकार बदलण्याची इच्छा आहे का?" असा प्रश्न सी व्होटरने दिल्लीतील मतदारांना विचारला असता. 1 फेब्रुवारीपर्यंतच्या ट्रॅकरनुसार, या प्रश्नावर उत्तर देताना, विद्यमान सराकारच्या कामावर आपण नाराज आहोत आणि यावेळी बदलाची इच्छा असल्याचे 43.9 टक्के लोकांनी म्हटले आहे. तसेच, 10.9 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, ते नाराज आहेत, पण सरकार बदलण्याची इच्छा नाही. तसेच, 38.3 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, आपण सरकारच्या कामकाजावर नाराज नाही यामुळे बदलही करू इच्छित नाही. अर्थात, बदल हवा असलेल्या आणि बदल नको असलेल्या लोकांमध्ये फारसे अंतर दिसत नाही.
एक महिन्यात किती बदल झाला -यापूर्वी 6 जानेवारीला एजन्सीने ट्रॅकरचा निकाल घोषित केला होता. तेव्हा 46.2 टक्के लोकांनी आपण विद्यमान सरकारवर नाराज आहोत आणि बदल आवश्यक असल्याचे म्हटले होते. तसेच, 2.7 टक्के लोकांनी, नाराज आहोत, मात्र आणखी एक संधी द्यायला हवी, असे म्हटले होते. तसेच, 46.9 टक्के लोकांनी, आपण नाराज नाही आणि बदलाची आवश्यकता नाही, असे म्हटले होते.
महत्वाचे म्हणजे, साधारणपणे एका महिन्यात नाराज आणि बदल हवा असणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. तर नाराज असूनही बदल नको, असे म्हणणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच, बदल नको म्हणणाऱ्यांमध्येही घट झाली आहे.