दिल्लीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 5 फेब्रुवारीला मतदान; एक्झिट पोलसंदर्भात EC नं जारी केली गाइडलाइन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:35 IST2025-02-03T19:34:47+5:302025-02-03T19:35:27+5:30
Delhi Election 2025: निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांच्या काही मोठ्या नेत्यांनी जनतेशी संपर्क साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीतील १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

दिल्लीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 5 फेब्रुवारीला मतदान; एक्झिट पोलसंदर्भात EC नं जारी केली गाइडलाइन
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता थांबला. ५ फेब्रुवारीला मतदान होईल आणि ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होतील. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांच्या काही मोठ्या नेत्यांनी जनतेशी संपर्क साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीतील १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
एक्झिट पोलवर कधीपर्यंत असती निर्बंध? -
तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत एक्झिट पोलवर निर्बंध घातले आहेत. या संदर्भात, दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एक आदेश देखील जारी केला आहे. निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जनसामान्य प्रामुख्याने वृत्तसंस्था, मीडिया हाऊसेस, रेडिओ आणि टेलिव्हिजन चॅनेल इत्यादींचे लक्ष भारत निर्वाचन आयोगाच्या अधिसूचना क्रमांक ५७६/एक्झिट /२०२५/SDR/भाग-१ दिनांक २२ जानेवारी २०२५ कडे आकर्षित केले जाते आहे की, प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनिक मीडिया अथवा कुठल्याही इतर पद्धथीने, एक्झिट पोल, ओपिनियन पोल अथवा इतर निवडणूक सर्वेक्षणाचे निकाल दाखवण्यावर बंदी राहील.
मतदानासाठी 13 हजार 766 पोलिंग बुथ -
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. एकूण ८३.७६ लाख पुरुष, ७२.३६ लाख महिला आणि १२६७ तृतीयपंथी मतदार आहेत. ७३३ मतदान केंद्रे दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
दिल्लीत निमलष्करी दलाच्या २२० कंपन्या तैनात -
निवडणूक आयोगाने दिल्लीत निमलष्करी दलाच्या २२० कंपन्या तैनात केल्या आहेत. १९ हजार होमगार्ड आणि ३५ हजार ६२६ दिल्ली पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.