"माझी विनंती आहे, पुन्हा 'अशा' योजनांची घोषणा करू नका"; अरविंद केजरीवाल यांचं अमित शाह यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 21:07 IST2025-01-24T21:06:01+5:302025-01-24T21:07:31+5:30
केंद्रीय गृहमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा उद्या संकल्प पत्राचा (जाहीरनामा) तिसरा भाग प्रसिद्ध करतील. यातच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री शाह यांना एक आवाहन केले आहे.

"माझी विनंती आहे, पुन्हा 'अशा' योजनांची घोषणा करू नका"; अरविंद केजरीवाल यांचं अमित शाह यांना आव्हान
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उद्या आपल्या जाहीरनाम्याचा तिसरा भाग प्रसिद्ध करणार आहे. यापूर्वी भाजपने दोन भागांत विविध योजना जाहीर केल्या आहेत. आता केंद्रीय गृहमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा उद्या संकल्प पत्राचा (जाहीरनाम्याचा) तिसरा भाग प्रसिद्ध करतील. यातच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री शाह यांना एक आवाहन केले आहे. "दिल्लीत ज्या योजना आधीपासूनच राबवल्या जात आहेत, त्यांचीच घोषणा पुन्हा करू नका. भाजपच्या स्वतःच्या योजना काय आहेत ते सांगा," असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे, "उद्या अमित शाहजी भाजपचे संकल्प पत्र III लाँच करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, कृपया आम आदमी पक्षाकडून दिल्लीत आधीपासूनच राबवण्यात येत आहेत, अशा मोफत वीज/पाणी यांसारख्या योजनांची पुन्हा घोषणा करू नये. दिल्लीसाठी भाजपची काय योजना आणि व्हिजन आहे, ते सांगा. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यात तुम्ही का अपयशी ठरलात आणि आता तुम्ही काय करणार, हे सांगा.
योगी आदित्यनाथ यांच्या विधानावरूनही टोला -
खरेतर, काल (गुरुवार) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन जाहीर सभांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षावरही जोरदार निशाणा साधला. यानंतर, अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया समोर आली. ते म्हणाले, "काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. मी त्याच्याशी १०० टक्के सहमत आहे. योगीजींनी दावा केला की त्यांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारली. जर हे खरे असेल तर, त्यांनी अमित शाह यांच्यासोबत बसून त्यांना ते समजावून सांगावे. कारण दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी अमित शाह यांच्यावर आहे.