Deep Sidhu, the 'villain' of the Red Fort, was opposed by farmers; Video viral | लाल किल्ल्यावरचा 'व्हिलन' दीप सिद्धूला शेतकऱ्यांनी पळवून लावले; Video व्हायरल

लाल किल्ल्यावरचा 'व्हिलन' दीप सिद्धूला शेतकऱ्यांनी पळवून लावले; Video व्हायरल

प्रजासत्ताक दिनाला आंदोलक शेतकऱ्य़ांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. यावरून शेतकऱ्यांची बदनामी होत असताना या हिंसाचारामागे कोण होते, याची नावे आता पुढे येऊ लागली आहेत. यापैकीच एक दीप सिद्धू. शेतकरी नेत्यांनी दिप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. त्यावर दिप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आता दीप सिद्धू यांचा नवीन व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. 


हा व्हिडीओ आज सकाळचा असल्याचे सांगितले जात आहे. लाल किल्ल्यावरून गायब झालेला दीप सिद्धू आज सकाळी पुन्हा आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेला होता. यावेळी शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. तसेच आंदोलकांना चिथावणी देण्यास उकसविल्याचा आरोप केला. यामुळे दीप सिद्धू आणि त्याच्यासोबत आलेल्या काही जणांनी तेथून पलायन केले. दीप सिद्धूच्या मागून काही शेतकरीही धावले. अखेर दीप सिद्धू एका बाईकवरून पसार झाल्याचे या व्हिडीओमध्ये आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. 


लाल किल्ल्यावरील तिरंगा हटविल्याच्या दाव्यावर दीप सिद्धू याने स्पष्टीकरण दिले आहे. "आंदोलनकर्त्यांनी लोकशाहीच्या अधिकारानुसारच लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकावला. आम्ही भारतीय झेंडा हटवला नाही", असं दिप सिद्धू यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यानं फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


दीप सिद्धू याचे काही फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अभिनेता सनी देओलसोबत व्हायरल झाल्याने त्याला शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळविण्यासाठी पाठविल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. यामुळे दीप सिद्धू कालपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू यांच्यावर आरोप केले आहेत. "दीपू सिद्धू आणि गँगस्टर ते नेता असा प्रवास केलेल्या लखा सिधाना यांनी काल रात्री सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भडकावण्याचं काम केलं", असा थेट आरोप यादव यांनी केला आहे. यासोबतच एक मायक्रोफोन घेऊन दीप सिद्धू लाल किल्ल्यापर्यंत कसा पोहोचला याचीही चौकशी व्हायला हवी, असंही ते पुढे म्हणाले. योगेंद्र यादव यांच्यासोबच भारतीय किसान युनियनचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह यांनीही दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. 


नोव्हेंबरपासून आंदोलनात सक्रिय
दीप सिद्धू गेल्या नोव्हेंबरपासून कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सक्रिय आहेत. "आंदोलनामुळे लोकांचा रोष वाढला आणि आंदोलकांना भडकवण्यासाठी कुठल्या एका व्यक्तीला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आमचे शेतकरी प्रदर्शन करत आहेत आणि आज जे झालं ते त्याला वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जाऊ शकत नाही", असं दिप सिद्धू म्हणाले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deep Sidhu, the 'villain' of the Red Fort, was opposed by farmers; Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.