महिंद्रा ग्रुपची महिंद्रा डिफेन्स सिस्टीम आणि ब्राझीलची मोठी एअरोस्पेस कंपनी एम्ब्रेअर यांच्यात मोठी संरक्षण डील झाली आहे. हवाई दलासाठी दारुगोळा, शस्त्रे आणि जवानांना ने-आण करण्यासाठी C-390 मिलेनियम हे मध्यम मालवाहू विमान भारतात तयार केले जाणार आहे. याचबरोबर दोन्ही देश टेहळणी आणि कमांड सेंटर असलेली अवाक्स प्रणालीची विमाने बनविण्यासही सहकार्य करणार आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता भूदलासोबतच हवाई दलाचे सक्षम असणे किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित झाले आहे. हवेतून हवेत, जमिनीवर किंवा जमिनीवरून हवेत- जमिनीवर मारा करण्यासाठी ड्र्रोन, मिसाईल किती महत्वाची आहेत, हे यातून स्पष्ट झाले आहे. हे एक आधुनिक युद्ध होते, जे भारताने पाकिस्तानच नाही तर तुर्की आणि चीनविरोधातही लढले होते. यामुळे हवाई दलाला सक्षम करण्यासाठी तसेच त्यांचे दळणवळणाचा वेग वाढविण्यासाठी ही एक मोठी डील मानली जात आहे.
भारतीय हवाई दलाकडे मोठी मालवाहू विमाने आहेत. परंतू, ती मोठ्या धावपट्टीवरच उतरविली जाऊ शकतात. यामुळे अरुणाचलप्रदेश, लडाख, जम्मू सारख्या किंवा पूर्वेकडील छोट्या राज्यांत वेगाने हालचाली करण्यासाठी मध्यम आकाराची मालवाहू विमानांची गरज होती. ती आता पूर्ण होणार आहे. एम्ब्रेअरने नवी दिल्लीत पूर्ण मालकीची उपकंपनी देखील स्थापन केली आहे. या विमानांच्या सहकार्याच्या बदल्यात ब्राझिलला आकाश मिसाईल, गरुड तोफा हव्या आहेत. भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने जगभरात दणका उडवून दिला आहे.
भारत आणि ब्राझील हे दोन्ही ब्रिक्स देश संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करतात. ब्राझीलची एम्ब्रेअर कंपनी सी-३९० मिलेनियम आणि इतर अवकाश तंत्रज्ञानासारख्या आधुनिक वाहतूक विमानांमध्ये विशेषज्ञ आहे. एम्ब्रेअरच्या ERJ-145 प्लॅटफॉर्मवर आधारित 'नेत्र' AWACS विमान भारताने विकसित केले होते. एम्ब्रेअर आणि महिंद्रा यांनी नवी दिल्लीतील ब्राझिलियन दूतावासात भारतीय हवाई दलाच्या मध्यम वाहतूक विमान (एमटीए) प्रकल्पासाठी करारावर स्वाक्षरी केली होती.
C-390 हे विमान सर्वाधिक म्हणजेच 26 टन माल वाहून नेऊ शकते. यामध्ये दोन M113 आर्मर्ड वाहने, एक बॉक्सर आर्मर्ड वाहन, एक सिकोर्स्की H-60 हेलिकॉप्टर किंवा 80 सैनिक किंवा 66 पॅराट्रूपर्स त्यांच्या पूर्ण गियरसह वाहून नेऊ शकते. या विमानाची रेंज १,८५२ किमी असून ते ८७० किमी/तास या वेगाने उडू शकते. या विमानात दोन IAE V2500-E5 टर्बोफॅन इंजिन बसविण्यात आली आहेत.