"तुझी हत्या होणार आहे", दाऊद गँगची भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 13:25 IST2022-06-18T12:04:12+5:302022-06-18T13:25:04+5:30
Sadhvi Pragya Thakur : प्रज्ञा ठाकूर यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

"तुझी हत्या होणार आहे", दाऊद गँगची भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना धमकी
भोपाळ : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. प्रज्ञा ठाकूर यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राजधानी भोपाळमधील टीटी नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत प्रज्ञा ठाकूर यांना दाऊद टोळीचा उल्लेख करून धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा माणूस म्हणून दिली आहे. तसेच, त्याने 'तुझी हत्या होणार आहे', असे सांगितले आहे.
प्रज्ञा ठाकूर यांच्यासोबत असलेल्या या संभाषणाचा व्हिडिओ सुद्धा लोकांनी रेकॉर्ड केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या या प्रकरणाबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, हा कॉल कोणत्या नंबरवरून आला, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत.
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे साध्वीने केले समर्थन
साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केले होते. या प्रकरणात त्यांनी भारत हिंदूंचा असल्याचे म्हटले होते. पाखंड्यांनी नेहमीच असे केले आहे. चित्रपट बनवून हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत सनातन येथे राहणार असून त्याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी म्हटले होते.