केसांना धरून सोफ्यावर फेकले, स्टीलच्या ग्लासने...; सुनेकडून सासूला मारहाण, नातवाने काढला VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:14 IST2025-10-01T16:11:12+5:302025-10-01T16:14:51+5:30
पंजाबमध्ये एका सूनेने तिच्या सासूला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केसांना धरून सोफ्यावर फेकले, स्टीलच्या ग्लासने...; सुनेकडून सासूला मारहाण, नातवाने काढला VIDEO
Punjab Crime: घरातील वृद्धांना मारहाण होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. प्रॉपर्टीच्या वादातून किंवा अन्य विविध कारणांनी वृद्धांना मारहाण झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. आता पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये एका सुनेनं तिच्या वृद्ध सासूला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुनेने सासूचे केस धरले आणि स्टीलच्या ग्लासने तिला मारहाण केली. वृद्ध महिलेचा नातू तिथे उभा राहून संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काढत होता.
पंजाबच्या गुरुदासपूर येथील कोठा गावात एका सुनेने तिच्या वृद्ध सासूवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वृद्ध महिलेवर हल्ला करत तिला मारहाणही करण्यात आली. जवळच उभ्या असलेल्या नातवाने संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काढला. तो त्याच्या आईला आजीला मारहाण करू नको असे सांगत होता पण त्याने तिला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. या घटनेवरुन संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस सध्या व्हिडिओच्या आधारे प्रकरणाचा तपास करत आहेत. पण कोणावरही कारवाई झालेली नाही. व्हिडीओमध्ये आरोपी महिला वृद्ध पुरूषाचे केस ओढतानाही दिसत आहे. वृद्ध महिलेची सून तिला का चावलीस असे विचारताना दिसत आहे. त्यानंतर ती तिच्या सासूला तिच्या हातात असलेल्या ग्लासने मारते आणि तिला शिवीगाळ करते. व्हिडिओमध्ये वृद्ध महिला असहाय्यपणे बसलेली दिसत आहे.
वृद्ध महिलेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. दरम्यान, हे प्रकरण तिब्बर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी स्वतःहून तपास सुरू केला आहे. सुनेनं तिच्या सासूला मारहाण का केली हे अद्याप अस्पष्ट आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य पुढे येत नाहीये आणि वाद मिटल्याचा दावा करत नाहीये.