महेश पुराणिक
मुंबई: रशियाकडून कच्च्या तेलासह लष्करी साहित्याची आयात करत असल्याने भारतावर २५% टॅरिफसह दंडात्मक कारवाईची धमकी देणाऱ्या अमेरिकेच्या डबल स्टॅण्डर्डची पोलखोल गेल्या दशकभरातील आकडेवारीतून होते.
युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल ट्रेड स्टॅटिस्टिक्स डेटाबेस आणि ट्रेडिंग इकॉनॉमिक्स यांच्याद्वारे यासंदर्भातील आकडेवारी जारी करण्यात आली आहे. त्यानुसार २०१५ ते २०२१ या कालावधीत अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचे मूल्य केवळ १ दशलक्ष डॉलर्स इतके होते. विशेष म्हणजे, रशियाने युक्रेनशी युद्ध पुकारल्यानंतरही अमेरिकेने आयात थांबवलेली नाही, अलट त्यात वाढच केली.
अमेरिका-रशिया आयातीचे मूल्य किती?१ दशलक्ष डॉलर्स२०१५–२०२१ (रशिया-युक्रेन युद्धाआधीची आकडेवारी)४.१६ अब्ज डॉलर्स२०२२–२०२४ (रशिया-युक्रेन युद्धादरम्यानची आकडेवारी)
अमेरिकेने रशियाकडून कोणकोणत्या वस्तू आयात केल्या? अमेरिकेने २०१५ पासून आतापर्यंत रशियाकडून शेकडो प्रकारच्या वस्तूंची आयात केली आहे. त्यातील काही प्रमुख वस्तू म्हणजे - खते, मोती, मौल्यवान खडे, धातू, नाणी, रसायने, लाकूड व लाकडी वस्तू, लाकडी कोळसा, यंत्रसामग्री, अणुभट्टी, बॉयलर, जनावरांचे खाद्य, बेस मेटल, विमाने, अवकाशयान, लोह आणि पोलाद, तेलबिया, फळे, धान्य, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स, रबर, ऑप्टिकल्स, वैद्यकीय उपकरणे, सुकामेवा, प्लास्टिक, दारू, व्हिनेगर, पादत्राणे, पीठ, दुग्धोत्पादने, कोको, काच इ.
युक्रेन युद्धादरम्यान आयातीची उड्डाणेरशियाने युक्रेनशी युद्ध छेडल्यापासून २०२२ ते २०२५ मध्ये अमेरिकेने रशियाकडून आयातीत वाढ केली असून ती तब्बल ४.१६ अब्ज डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच, भारताला रशियाशी व्यापार बंद करण्याचा सल्ला देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची अवस्था दिव्याखाली अंधार अशीच झाल्याचे स्पष्ट होते.रशिया-युक्रेनमधील ताजे युद्ध फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरु झाले. पण, तत्पूर्वी फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरु केलेल्या संघर्षात रशियाने युक्रेनचा क्रिमिया प्रांत ताब्यात घेतला. या काळातही अमेरिकेने रशियाशी व्यापार थांबवला नाही. उलट, गेल्या दहा वर्षांत अमेरिकेने रशियाकडून भरमसाठ आयात केली आणि हेच ‘ट्रुथ’ आहे.