CoronaVirus News: अबब... एका दिवसात एक लाख कोरोना रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 05:07 AM2021-04-06T05:07:45+5:302021-04-06T05:08:06+5:30

देशात नव्या कोरोना रुग्णांचा उच्चांक

Daily Covid 19 case count crosses 1 lakh for first time since pandemic began | CoronaVirus News: अबब... एका दिवसात एक लाख कोरोना रुग्णांची नोंद

CoronaVirus News: अबब... एका दिवसात एक लाख कोरोना रुग्णांची नोंद

googlenewsNext

- एस. के. गुप्ता 

नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखावर पोहोचला असून, हा एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधित आढळण्याचा सार्वकालिक उच्चांक आहे. विशेष म्हणजे केवळ २५ दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येने २० हजारांवरून एक लाखापर्यंतचा टप्पा गाठला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात एक लाख तीन हजार ५५८ कोरोनाबाधितांची नोंद झाली. यापूर्वी गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी देशभरात ९७ हजार ८९४ बाधितांची नोंद झाली होती. तो त्यावेळचा उच्चांक होता. मात्र, हा उच्चांकही मोडीत निघाला आहे. बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होण्याचा २६वा दिवस होता. अवघ्या २५ दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येने लाखाचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णवाढीचा वेग महाराष्ट्रात सर्वाधिक असून, राज्यात रविवारी तब्बल ५७ हजार रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. 

देशात सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, ८ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत, त्यांच्याकडील परिस्थितीचा आढावाही पंतप्रधान घेणार आहेत.

देशाची सद्य:स्थिती
गेल्या २४ तासांत झालेली रुग्णवाढ : १,०३,५५८
मृत्युमुखी पडलेले बाधित : ४७७
एकूण बाधितांची संख्या : १,२५,८९,०६७
बरे झालेल्या बाधितांची संख्या : १,१६,८०,३२४
एकूण कोरोनाबळी : १,६५,१३८
रिकव्हरी रेट : ९२.८० %

कोरोना संक्रमणाचा वेग ६.८ टक्के एवढा आहे. गेल्या वर्षी हाच वेग 
५.५ टक्के एवढा होता. तूर्तास परिस्थिती गंभीर आहे. लोकांनी कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सर्व अटी-नियमांचे काटेकोर पालन करणे आत्यंतिक गरजेचे आहे.     - राजेश भूषण, केंद्रीय आरोग्य सचिव

Web Title: Daily Covid 19 case count crosses 1 lakh for first time since pandemic began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.