Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 19:06 IST2025-11-26T19:05:04+5:302025-11-26T19:06:08+5:30
हिंद महासागरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता हळूहळू अधिक मजबूत होऊन 'सेन्यार' नावाच्या चक्रीवादळात रूपांतरित होत आहे.

Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
हिंद महासागरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता हळूहळू अधिक मजबूत होऊन 'सेन्यार' नावाच्या चक्रीवादळात रूपांतरित होत आहे. या धोकादायक स्थितीमुळे भारतीय हवामान विभागाने दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांसाठी, विशेषत: तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि अंदमान-निकोबार बेटांवर अतिवृष्टीचा गंभीर इशारा दिला आहे. पुढील काही दिवस मच्छिमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांसाठी अत्यंत धोक्याचे आहेत.
मल्लकका सामुद्रधुनी, बंगालचा उपसागर आणि दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर या प्रणालीचा मोठा परिणाम दिसून येत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्णपणे चक्रीवादळात रूपांतरित होत आहे. यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर सलग जोरदार पाऊस सुरू आहे, तर तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी आणि लक्षद्वीपच्या किनारी व बेटांच्या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह संततधार पाऊस पडत आहे.
समुद्र खवळला, मच्छिमारांना कडक इशारा
अंदमान सागर, मलक्का सामुद्रधुनी आणि बंगालच्या उपसागरात समुद्राची स्थिती अत्यंत वाईट आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी मच्छिमार आणि किनारी समुदायांना कडक इशारा जारी केला आहे. जोपर्यंत हवामानात सुधारणा होत नाही, तोपर्यंत कोणीही खुल्या समुद्रात जाण्याचे धाडस करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
७२ तास अतिधोक्याचे, वाऱ्याचा वेग १०० किमी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळामुळे पुढील ७२ तास (२९ नोव्हेंबरपर्यंत) दक्षिण राज्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या कालावधीत ६५ ते १०० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अंदमान-निकोबार: २६ ते २९ नोव्हेंबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा.
तमिळनाडू: २६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता.
केरळ: येथेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमा: २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज.
ओडिशा आणि पश्चिम बंगाल: या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तमिळनाडूतील ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट
शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी तमिळनाडूतील सहा जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि काही ठिकाणी अत्यधिक अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.तिरुवरूर, नागपट्टिनम, मयिलादुथुरै, कुड्डालोर, विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू, तसेच पुदुच्चेरी आणि कराईकल या ठिकाणीही रेड अलर्ट देण्यात आला आहे.
या भागांमध्ये ७ ते १५ सेंटीमीटर आणि काही ठिकाणी १२ ते २० सेंटीमीटरपर्यंत खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकलच्या किनारी भागांमध्ये ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहू शकतात. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.