Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 07:27 IST2025-10-30T07:26:22+5:302025-10-30T07:27:25+5:30
Cyclone Montha : आंध्र प्रदेशमध्ये मोंथा चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळत आहे. तेलंगणामध्येही वादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे.

Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
आंध्र प्रदेशमध्ये मोंथा चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळत आहे. तेलंगणामध्येही वादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या अंदाजानुसार, मोंथामुळे १८ लाख लोकांना मोठा फटका बसला आहे, चक्रीवादळ ताशी १०० किमी वेगाने राज्यात धडकलं आणि २.१४ लाख एकरवरील पिकं उद्ध्वस्त झाली.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोंथामुळे राज्यात तीन जणांचा मृत्यू झाला. २,२९४ किलोमीटर रस्त्यांचं नुकसान झालं. प्रभावित जिल्ह्यांमधील १,२०९ मदत शिबिरांमध्ये १,१६,००० लोकांना आश्रय मिळाला. आंध्र प्रदेशात मोंथाच्या विनाशकारी प्रभावामुळ तेलंगणाच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडला. आठ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसाचा कहर
तेलंगणातील वारंगल, जनगाव, हनुमकोंडा, महाबूबाबाद, करीमनगर, सिद्दीपेट, यादाद्री भुवनागिरी, सूर्यपेट, नलगोंडा, खम्मम, भद्राद्री कोठागुडेम, नगरकुरनूल आणि पेद्दापल्ली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. हैदराबादमध्येही मुसळधार पाऊस पडला. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी चक्रीवादळ मोंथामुळे होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
रेल्वे स्टेशनवरील ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली
मोंथामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे वारंगलमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. वारंगल रेल्वे स्टेशनवरील ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेले, ज्यामुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली. तेलंगणामध्ये, महाबूबाबाद जिल्ह्यातील दोर्नाकल रेल्वे यार्डमध्ये पाणी भरल्याने अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या. आंध्र प्रदेशात मोंथा चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसात अडकलेल्या अनेक लोकांसाठी ड्रोन देवदूत ठरला.
ड्रोनचा वापर करून वाचवला जीव
बापटला जिल्ह्यात शेख मुन्ना नावाचा एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेला आणि ड्रोनचा वापर करून त्याला वाचवण्यात आलं. पोलीस आणि प्रशासनाने ड्रोनचा वापर करून सखल भागात देखरेख केली आणि परिस्थिती बिघडण्यापूर्वी लोकांना सतर्क केले. एनडीआरएफचं मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. एनडीआरएफच्या २६ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. ६६६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.