‘मिचाँग’नं घेतले १२ बळी, चेन्नई, आंध्रात थैमान; रेल्वे, विमान वाहतुकीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 07:03 AM2023-12-06T07:03:29+5:302023-12-06T07:04:07+5:30

वादळामुळे ओडिशा, तेलंगणात सतर्कता बाळगण्यात आली आहे. वादळाने आंध्र प्रदेशात मोठा विध्वंस घडवून आणला.

cyclone michaung floods Chennai, 12 dead, air, rail services hit | ‘मिचाँग’नं घेतले १२ बळी, चेन्नई, आंध्रात थैमान; रेल्वे, विमान वाहतुकीला फटका

‘मिचाँग’नं घेतले १२ बळी, चेन्नई, आंध्रात थैमान; रेल्वे, विमान वाहतुकीला फटका

अमरावती : ‘मिचाँग’  चक्रीवादळाने मंगळवारी दुपारी १२.३० ते २.३० च्या दरम्यान आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडली असली तरी या वादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडूतील चेन्नई आणि जवळील परिसराला बसला. वादळामुळे १०० पेक्षा अधिक ट्रेन, १०० पेक्षा अधिक विमाने रद्द करण्यात आली असून, चेन्नईत पुरामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.    

वादळामुळे ओडिशा, तेलंगणात सतर्कता बाळगण्यात आली आहे. वादळाने आंध्र प्रदेशात मोठा विध्वंस घडवून आणला. किनारपट्टीसह अनेक भागांत पावसाने थैमान घातले. रस्ते वाहून गेले, पूरस्थिती निर्माण होऊन हजारो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.

२०० टेबल-टेनिसपटू अडकले
विजयवाडा येथे आपले पहिले ११ वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन विजेतेपद पटकावणे बंगालची युवा टेबल-टेनिसपटू श्रीओश्री चक्रवर्ती हिच्यासाठी आनंदासोबत दु:खही घेऊन आले. कारण वादळामुळे तेथे अडकून पडलेल्या या खेळाशी संबंधित ३०० लोकांत तिचाही समावेश आहे. तुफान पाऊस झाल्याने ही सगळी मंडळी विजयवाड्यात अडकून पडली आहेत.

५००० कोटींची मदत द्या.
वादळाने झालेल्या विनाशाच्या पार्श्वभूमीवर, डीएमके सरकारने ५००० कोटी रुपयांच्या अंतरिम मदतीची विनंती केली आहे, असे राज्यसभा खासदार तिरुची सिवा यांनी मंगळवारी सांगितले. 

बेघर लोकांसाठी अनकापल्ली जिल्ह्यात ५२ पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्यात आली असून, तेथे ६० हजारांहून अधिक लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चार लाख टन धान्य भिजू नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलली. एलुरू जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली

एनडीआरएफची २९ पथके तैनात
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा व पुद्दुचेरीमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण २९ पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. चेन्नई शहर व आसपासच्या जलमय भागांत अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी बोटी आणि ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. पावसामुळे जखमी झालेल्या अन्य ११ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: cyclone michaung floods Chennai, 12 dead, air, rail services hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.