पाकिस्तानी महिलेसोबत केलेलं लग्न लपवणारा बडतर्फ सीआरपीएफ जवान मुनीर अहमदने या आरोपांवर आता स्पष्टीकरण दिलं आहे. बडतर्फ केलेल्या जवानाने सांगितलं की, २०२२ मध्ये त्याने लग्नासाठी विभागाकडे परवानगी मागितली होती, परंतु उशीर झाल्याने त्याने मे २०२४ मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीनलशी लग्न केलं. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मुनीर अहमद याने एक मोठं रहस्य उघड केलं.
मुनीरने सांगितलं की त्याने त्याच्या मामे बहिणीशी लग्न केलं होतं आणि त्यांचं लग्न लहानपणीचं ठरलं होतं. मीनल माझ्या मामाची मुलगी आहे. भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी माझं कुटुंब आणि त्यांचं कुटुंब जम्मू आणि काश्मीरमध्ये राहत होतं. सध्या मीनलचं कुटुंब पाकिस्तानातील सियालकोट येथे राहते. आमचं लग्न लहानपणीच ठरवलं गेलं होतं असं म्हटलं.
"मी लग्नाची परवानगी मिळावी म्हणून ३१ डिसेंबर २०२२ रोजी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं. २४ जानेवारी २०२३ रोजी अधिकाऱ्यांनी माझं पत्र काही आक्षेपांसह परत केलं आणि लग्नपत्रिका आणि लग्न कुठे होणार आहे याची माहिती मागितली. यानंतर मी दुसरं पत्र पाठवलं, ज्यात लग्नाची संपूर्ण माहिती दिली होती. माझं पत्र जम्मू रेंज आणि सीआरपीएफ दिल्लीच्या डीआयजींना गेलं आणि सुमारे ५ महिन्यांनंतर मला उत्तर मिळालं, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की अर्जदाराने विभागाला कळवलं आहे."
"माझ्या वडिलांना कॅन्सर"
"माझ्या वडिलांना कॅन्सर आहे आणि दुसरीकडे विभागाकडून पत्र मिळण्यास विलंब झाला. मीनलला व्हिसाही मिळत नव्हता. या कारणास्तव, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने, आमचं लग्न व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले. जवळपास ९-१० महिन्यांनंतर पाकिस्तानात असलेल्या मीनलला भारतात येण्याची परवानगी मिळाली. ती २८ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतात आली. मी याबद्दल विभागाला माहिती दिली होती. मी डेप्युटी कमांडंटलाही कळवलं होतं. व्हिजिट व्हिसा मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत दीर्घकालीन व्हिसासाठी (LTV) अर्ज करावा लागतो. या काळात आमचं एलटीव्हीसाठी फील्ड व्हेरिफिकेशन झालं. यानंतर, आम्हाला सांगण्यात आले की मीनल भारतात एलटीव्हीमध्ये राहू शकते."
"माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप धक्कादायक"
"मला मीडिया रिपोर्टमधून मी बडतर्फ झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मला सीआरपीएफकडून माझ्या बडतर्फीची माहिती देणारे पत्र मिळालं. हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप धक्कादायक होतं कारण मी मीनल खानशी लग्न करण्यासाठी मुख्यालयाकडून परवानगी मागितली होती आणि लग्नानंतर कळवलं देखील होतं" असं मुनीर अहमदने म्हटलं आहे.