पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 13:07 IST2025-10-21T13:05:19+5:302025-10-21T13:07:56+5:30
Drone Attack in Myanmar: काही दिवसांपूर्वी आसाम रायफल्सच्या तळावर झालेल्या हल्ल्याच्या बदल्यात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
नेपीडॉ/नवी दिल्ली: भारत आणि म्यानमार सीमेवरील उग्रवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि निर्णायक कारवाई झाल्याचे वृत्त आहे. २० ऑक्टोबरच्या रात्री म्यानमारच्या सगाइंग भागामध्ये नागा अतिरेकी गट NSCN (K-YA) च्या तळांवर भीषण ड्रोन हल्ला करण्यात आला. काही दिवसांपूर्वी आसाम रायफल्सच्या तळावर झालेल्या हल्ल्याच्या बदल्यात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
हा हल्ला इतका शक्तिशाली होता की, यामध्ये अनेक ठिकाणे एकाच वेळी लक्ष्य करण्यात आली. या कारवाईत मेजर जनरल पी. आंग माई या वरिष्ठ कमांडरचा मृत्यू झाल्याची माहिती म्यानमारमधील मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. याला अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
ड्रोन स्ट्राइकचे स्वरूप आणि परिणाम
या ड्रोन हल्ल्यात हाय-प्रिसिजन गाईडेड ड्रोन वापरून अनेक बॉम्ब डागण्यात आले, ज्यामुळे उग्रवाद्यांचे कमांड पोस्ट आणि आजूबाजूच्या निवासी जागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे. अनौपचारिक माहितीनुसार, हल्ल्यानंतर आंग माईच्या कमांड युनिटशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
पी. आंग माई हा NSCN (K-YA) या गटाचा वरिष्ठ नेता होता आणि त्याला भारत विरोधी मानले जात होते. काही महिन्यांत झालेला हा दुसरा मोठा ड्रोन हल्ला आहे. यापूर्वी जुलै २०२५ मध्ये झालेल्या अशाच कारवाईत ULFA-I आणि NSCN (K) या गटांचे अनेक नेते मारले गेले होते.
१७ ऑक्टोबरला आसाम रायफल्सच्या तळावर हल्ला...
ULFA-I आणि NSCN (K-YA) च्या संशयित उग्रवाद्यांनी अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात असलेल्या आसाम रायफल्सच्या तळावर हल्ला केला होता. म्यानमारमधील सगाइंग प्रदेश हा नागा आणि आसाममधील अतिरेकी गटांसाठी गेली अनेक वर्षे लपण्याचा, दहशतवादी कारवाया करण्याचा तळ बनला आहे. भारतीय गुप्तचर संस्था आणि म्यानमारमधील स्थानिक गट यांच्यात समन्वयाने ही कारवाई झाल्याची शक्यता काही विश्लेषकांनी वर्तवली आहे.