लाचखोर हवालदार फरार
By Admin | Updated: March 20, 2015 22:39 IST2015-03-20T22:39:59+5:302015-03-20T22:39:59+5:30
६० हजाराची घेतली लाच : पाचपावली पोलीस ठाण्यात कार्यरत

लाचखोर हवालदार फरार
६ हजाराची घेतली लाच : पाचपावली पोलीस ठाण्यात कार्यरत नागपूर : पोलीस विभागात वाढत्या लाचखोरीमुळे पोलीस आयुक्तांनी संताप व्यक्त केल्यानंतरही, पोलीस कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी होत आहे. गुरुवारी एमआयडीसीच्या पोलीस शिपायाला अटक केल्यानंतर , पाचपावलीच्या हवालदारावरीही एसीबीने (ॲन्टी करप्शन ब्यूरो) ट्रॅप लावला होता. मात्र एसीबीच्या पथकाला चकमा देऊन त्याने पळ काढला.पाचपावली ठाण्याच्या या लाचखोर फरार हवालदाराचे नाव सय्यद नसीम जोहर ऊर्फ सय्यद अब्दुल अलीम आहे. त्याने जानेवारी महिन्यात चार अल्पवयीन वाहन चोरांना अटक केली होती. यात एहतेशान शेख यांचा भाचा होता. नसीमने शेख व इतर अल्पवयीन मुलांच्या वडिलांकडून ६० हजार रुपये मागितले होते. त्यानंतर पुन्हा नसीमने शेख यांच्याकडे २० हजाराची मागणी केली होती. पैसे न दिल्यास पुन्हा मुलांवर कारवाई करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे शेखने ॲण्टी करप्शन ब्यूरोकडे तक्रार केली. नसीमने गुरुवारी रात्री १० वाजता शेख ला ५००० रुपये घेऊन बोलाविले. एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. नसीमने शेखला चहाच्या दुकानावर घेऊन गेला. सापळा लावून बसलेल्या पथकाचे कर्मचारी शेखच्या इशाऱ्याची वाट बघत होते. अंधार असल्याने शेखचा इशारा त्यांच्या लक्षात आला नाही. त्यामुळे शेख ने एसीबीच्या पथकाजवळ जाऊन इशारा केला. नसीमच्या लक्षात आल्याने तो पैसे घेऊन फरार झाला. एसीबीने त्याच्या मोमिनपुरा येथील घरीही तपास केला, तिथेही तो नव्हता. एसीबीचे पथक त्याच्या शोधात आहे.