Crime: मेट्रिमोनियल साइटवर AIIMS चा डॉक्टर बनला वॉर्डबॉय, नर्सशी केली मैत्री, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 11:17 IST2023-03-15T11:15:30+5:302023-03-15T11:17:03+5:30
Crime News: वॉर्डबॉयने स्वत: एम्समध्ये डॉक्टर असल्याचे सांगत नर्ससोबत मैत्री केली. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर दोन वर्षे बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Crime: मेट्रिमोनियल साइटवर AIIMS चा डॉक्टर बनला वॉर्डबॉय, नर्सशी केली मैत्री, त्यानंतर...
छत्तीसगडमधील रायपूरमधून बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे वॉर्डबॉयने स्वत: एम्समध्ये डॉक्टर असल्याचे सांगत नर्ससोबत मैत्री केली. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर दोन वर्षे बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपी तरुण एका खासगी रुग्णालयामध्ये वॉर्डबॉयचं काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना अभनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत सांगितले की, ती लग्नासाठी ऑनलाइन मेट्रिमोनी साइटवरून मुलाचा शोध घेत होती. तेव्हा तिची ओळख निलेशशी झाली. त्याने स्वत:ची ओळख रायपूरमधील एम्समधील डॉक्टर अशी करून दिली होती. त्यानंतर या दोघांमध्ये ओळख होऊन बोलणं सुरू झालं.
हळुहळू त्यांच्यातील जवळीक वाढली. त्यानंतर आरोपी निलेशने नर्ससोबत संबंध ठेवण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे त्याने कुठल्यातरी अन्य मुलीसोबत साखरपुडा उरकून घेतला. त्यानंतर नर्सने त्याच्याबाबत माहिती मिळवली तेव्हा, ती माहिती ऐकून तिला धक्काच बसला. स्वत:ची ओळख एम्समधील डॉक्टर म्हणून करून देणार तो तरुण डॉक्टर नसल्याचे उघड झाले. त्यानंतर या दोघांमध्येही कडाक्याचं भांडण झालं. तसेच हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. तिथे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सदर तरुण हा एका खासगी रुग्णालयात वॉर्डबॉयचं काम करतो, अशी माहिती समोर आली.
या प्रकरणी अभनपूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका नर्सवर बलात्कार केल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. आरोपी निलेश मांडे याने स्वत: डॉक्टर असल्याचे सांगितले आणि सुमारे दोन वर्षांपर्यंत नर्सवर अत्याचार केले. तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याची चौकशी सुरू आहे.