Crime Story : एका लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीत तिसरा नवा ट्विस्ट, पतीचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 23:44 IST2021-12-30T23:30:33+5:302021-12-30T23:44:27+5:30
बिहारमधील एका युवक पतीने 26 डिसेंबर रोजी आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला. जुमई जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील हे तिघेजण रहिवाशी आहेत

Crime Story : एका लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीत तिसरा नवा ट्विस्ट, पतीचा गंभीर आरोप
पाटणा - बिहारमधील प्रेमाच्या त्रिकोणाच्या घटनेत आता चांगलाच ट्विस्ट आला आहे. जुमई जिल्ह्यात चित्रपटाला साजेल अशी घटना घडली होती. सन 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील कथानकाप्रमाणेच घडलेल्या या प्रेमकहानीची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देण्याचं धाडसी काम येथील तरुणाने केल्याची चर्चा होती. मात्र, पतीने हे वृत्त फेटाळले असून मुलाच्या नातेवाईकांनी बंदुकीचा धाक दाखवून माझ्या पत्नीचं लग्न लावून दिल्याचा आरोप केला आहे.
बिहारमधील एका युवक पतीने 26 डिसेंबर रोजी आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला. जुमई जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील हे तिघेजण रहिवाशी आहेत. खैरा येथील डांसिडीह गावातली गुरु रविदास यांची मुलगी शिवानी कुमारीचे लग्न दोन वर्षांपूर्वी बल्थर गावातील विकास दास यांच्यासोबत झाले होते. पती-पत्नी एकत्र राहात होते. विकास हा बंगळुरू येथील एका कंपनीत नोकरी करत होता. त्यामुळेच, लग्नानंतर आपल्या पत्नीला घेऊन विकास बंगळुरूला गेला.
विकासने पत्नीलाही आपल्या कंपनीत कामाला लावले, दरम्यान येथेच सचिन कुमार या युवकाशी शिवानीची ओळख झाली. त्यानंतर, गप्पागोष्टीतून मैत्री आणि मैत्रीनंतर दोघांमध्ये प्रेमही झाले. या दोघांमध्ये जवळीकता एवढी वाढली की शिवानीने सचिन कुमारसोबत राहण्याबाबत पतीला विचारणा केली. पत्नीची इच्छा आणि तिचे सचिनकुमारवरील प्रेम लक्षात घेऊन विकासने एक पाऊल पुढे टाकत निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, हा सगळा बनाव असून माझ्या पत्नीच्या भांगेत जबरदस्तीने कुंक लावण्यात आल्याचे विकासने म्हटले आहे.
सचिन कुमारच्या नातेवाईकांनी जोरजबरदस्तीने बंदुकीचा धाक दाखवून माझ्या पत्नीचे लग्न सचिन कुमारशी लावून दिले. पत्नी शिवानी आणि सचिन कुमारनेच हा बनाव रचला होता. त्यांनीच हा व्हिडिओ व्हायरल केला असून मला जीवे मारण्याची धमकी देत, माझ्याकडून मी स्वत;च्या मर्जीने लग्न लावून देत असल्याचं वदवून घेतल्याचा आरोप विकासने केला आहे. त्यामुळे, प्रेमाचा हा ट्रायअँगल नकली असल्याचं चर्चा आता होत आहे. दरम्यान, विकासला बंगळुरुतील कंपनीत काम करणे अवघड होऊन बसले आहे.
दरम्यान, हम दिल दे चुके सनम चित्रपटातील अजय देवगणच्या भूमिकेत विकास तर सलमान खानच्या भूमिकेत सचिन कुमार दिसून आला असून ऐश्वर्या रायची जागा शिवानीने घेतली आहे. त्यामुळे, फिल्मी स्टाईल सत्यकथेची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, यात अचानक ट्विस्ट आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.