CP Radhakrishnan Meets PM Modi: उपराष्ट्रपतीपदासाठी NDA चे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीपूर्वी त्यांचे दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, भूपेंद्र यादव, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता स्वागतासाठी उपस्थित होत्या. भाजपने संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर रविवारी (१७ ऑगस्ट २०२५) राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली होती.
'सीपी राधाकृष्णन यांचा अनुभव देशासाठी उपयुक्त ठरेल'पंतप्रधान मोदींनी एक्सवर या भेटीचे फोटो शेअर करत म्हटले की, "सीपी राधाकृष्णन यांची आज भेट घेतली. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांचा विविध क्षेत्रातील दीर्घ अनुभव आपल्या देशाला नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यांनी नेहमीच दाखवलेल्या समर्पणाने आणि दृढनिश्चयाने ते देशाची सेवा करत राहोत," असे मोदी म्हणाले.
तसेच, राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रविवारी (१७ ऑगस्ट २०२५) देखील त्यांच्यासाठी खास पोस्ट केली होती. आपल्या एक्स पोस्टमध्ये मोदी म्हणतात, "सीपी राधाकृष्णन यांना खासदार आणि विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून मोठा अनुभव आहे. राज्यपाल पदाच्या कारकिर्दीत त्यांनी नेहमीच सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यावर लक्ष केंद्रित केले. या अनुभवांमुळे त्यांना कायदेविषयक आणि घटनात्मक बाबींचे विस्तृत ज्ञान आहे. त्यांनी तामिळनाडूमध्येही तळागाळात व्यापक काम केले आहे. एनडीएने त्यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामांकित करण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे."