जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:01 IST2025-09-10T13:58:41+5:302025-09-10T14:01:02+5:30
३ वर्षापूर्वी देशात उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी एनडीएकडून जगदीप धनखड रिंगणात होते.

जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
नवी दिल्ली - उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांचा विजय झाला. ते भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. राधाकृष्णन यांच्याविरोधात विरोधी इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी मैदानात उतरले होते. परंतु १५२ मतांनी त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली. निवडणुकीत १५ मते बाद करण्यात आली. जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले. त्यानंतर या पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक पार पडली.
२०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत काय घडले?
३ वर्षापूर्वी देशात उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी एनडीएकडून जगदीप धनखड रिंगणात होते. धनखड यांचा या निवडणुकीत विजय झाला होता. त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत एकूण ७२५ मते पडली होती. त्यातील जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली तर विरोधी पक्षातील मार्गारेट अल्वा यांना १८२ मते पडली होती. या निवडणुकीतही १५ मते बाद झाली होती. धनखड आणि अल्वा यांच्यातील विजयाचे अंतर ३४६ मतांचे होते.
विरोधी पक्षाला झटका
यंदाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाला झटका मिळाल्याचे बोलले जाते. विरोधकांना कमीत कमी ३२० हून अधिक मते मिळणे अपेक्षित होते परंतु रेड्डी यांना ३०० मते मिळाली. संध्याकाळी ५ वाजता मतदान संपल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विरोधकांची एकजूट असून ३१५ खासदारांनी मतदान केले असं सांगितले होते.
दरम्यान, २०१४ पासून देशात भाजपाची सत्ता आहे. या काळात २०१७, २०२२ आणि आता २०२५ मध्ये उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पडली. त्यात २०१७ च्या निवडणुकीत भाजपाचे व्यंकय्या नायडू यांना ५१६ मते पडली होती तर विरोधी उमेदवाराला २४४ मते होती. २०२२ मध्ये धनखड यांना ५२८ मते मिळाली ते निवडून आले आणि आता २०२५ मध्ये ४५२ मते मिळत सी.पी राधाकृष्णन विजयी झाले. परंतु विरोधकांची मते गेल्यावेळच्या तुलनेत १८२ वरून यंदा ३०० इतकी झाली आहेत.