Cows Exhale Oxygen Can Cure Breathing Problems Says Uttarakhand CM trivendra singh rawat | गाय ऑक्सिजन घेते अन् ऑक्सिजनच सोडते; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

गाय ऑक्सिजन घेते अन् ऑक्सिजनच सोडते; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

डेहराडून: ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन सोडणारा गाय हा जगातील एकमेव प्राणी असल्याचं विधान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केलं आहे. गायीला काही वेळ गोंजारल्यानं श्वसनाचे आजार बरे होतात, असंदेखील ते पुढे म्हणाले. गायीची उपयोग्यता सांगणारा रावत यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

गाय प्राणवायू (ऑक्सिजन) सोडते, त्यामुळेच तिला माता म्हटलं जातं. गायीचं शेण आणि गोमूत्र आपल्यासाठी फायदेशीर असतं. त्याचा वापर किडनी आणि हृदयाशी संबंधित आजार बरे करण्यासाठी होतो. एखादा क्षयरोगी गायीच्या आसपास राहिल्यास तो ठीक होऊ शकतो. आता आपले वैज्ञानिकदेखील या गोष्टींना दुजोरा देत आहेत, असं रावत व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या विधानाबद्दल मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्टीकरण जारी केलं. 'डोंगराळ भागात राहणाऱ्यांना गायीबद्दल आदर वाटतो. गायीबद्दल त्यांना वाटणाऱ्या भावनाच मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवल्या. मात्र काही जण मुख्यमंत्र्यांचा दुस्वास करतात. अशा व्यक्तींकडून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळण्याची कामं केली जातात,' अशा शब्दांत मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी रावत यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. 

याआधी त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते विप्लब देव यांनी बदकांचं महत्त्व सांगताना अजब दावा केला होता. पाण्यात बदक पोहल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं असं विधान त्यांनी केलं होतं. पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढण्यासाठी संपूर्ण राज्यात बदकांचं वाटप करण्याचा विचार करत असल्याचंदेखील ते म्हणाले होते. बदक वाटल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत तेजी येईल. बदक पाण्यात पोहल्यामुळे पाण्याचं रिसायकलिंग होतं आणि त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, असं देव म्हणाले होते. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cows Exhale Oxygen Can Cure Breathing Problems Says Uttarakhand CM trivendra singh rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.