...अन् 'त्यांचं' सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं; लग्नासाठी पळालेल्या जोडप्यासोबत विपरीत घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 15:13 IST2021-11-02T15:11:19+5:302021-11-02T15:13:33+5:30
एका प्रेमी जोडप्याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. लग्न करण्यासाठी घरातून पळालेल्या जोडप्यासोबत विपरीत घडलं आहे.

...अन् 'त्यांचं' सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं; लग्नासाठी पळालेल्या जोडप्यासोबत विपरीत घडलं
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका प्रेमी जोडप्याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. लग्न करण्यासाठी घरातून पळालेल्या जोडप्यासोबत विपरीत घडलं आहे. उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रेम विवाहासाठी घरातून पळालेल्या प्रेमी जो़डप्याचा भीषण अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तरुणाच्या चुलत भावाचादेखील या अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे संसार सुरू होण्याआधीच त्याचा भयावह शेवट झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली आहे. तसेच तिघांचेही मृतदेह हे पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. ही घटना कोतावली परिसरातील रेल्वे फ्लायओव्हरजवळ रविवारी रात्री साधारण 12 वाजता घडली. पोलीस ठाण्याचे प्रमुख निरीक्षक जगदीश चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा चुलत भाऊ आणि तरुणी बाईकवरुन जात होते. रेल्वे फ्लायओव्हरजवळ एका अज्ञात वाहनाने बाईकला धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला. तिघांची आता ओळख पटली आहे.
तरुण आणि तरुणीचा जागेवरच मृत्यू
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही एकाच गावचे रहिवासी आहेत. तरुण आणि तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. तरुणाचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने पोलिसांना तरुण-तरुणीचं प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघेही लग्न करण्यासाठी घरातून पळाले होते. तरुण त्यांना सोडण्यासाठी कासगंज जात होता. याचदरम्यान हा भीषण अपघात घडला अशी माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.