Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला हवामानाचा अंदाज समजू नका, बेफिकीर लोकांना केंद्राचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 07:21 PM2021-07-13T19:21:31+5:302021-07-13T19:21:31+5:30

Coronavirus: कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा लोकांमधील बेफिकीरी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. बाजार तसेच पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ लागली आहे.

Coronavirus: Third Wave of Corona virus Don't Understand Weather Forecast | Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला हवामानाचा अंदाज समजू नका, बेफिकीर लोकांना केंद्राचा गंभीर इशारा

Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला हवामानाचा अंदाज समजू नका, बेफिकीर लोकांना केंद्राचा गंभीर इशारा

googlenewsNext

नवी दिल्ली - एप्रिल-मे महिन्यात संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा लोकांमधील बेफिकीरी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. बाजार तसेच पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्याच्या मुद्द्यावरून लोकांना गंभीर इशारा दिला आहे. (Third Wave of Corona virus )

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही हे प्रकृतीपेक्षा आपल्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. बाजार आणि पर्यटनस्थळांवर होत असलेली गर्दी आणि मास्कचा वापर होत नसल्याचा उल्लेख करून आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लोक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत बोलताना त्याबाबत हवामानाच्या अंदाजाप्रमाणे विचार करत आहेत. मात्र याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. ही बाब पहिल्या पावसानंतर फिरण्यासारखी नाही तर ही मनुष्य आणि विषाणूमध्ये चालणारी लढाई आहे. कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही हे निसर्गापेक्षा आमच्या वर्तनावर अवलंबून असेल, असेही आरोग्य मंत्रायाने सांगितले.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, जगामध्ये कोरोनाची तिसरी लाट दिसत आहे. ही लाट आपल्या देशात येऊ नये यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशामध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ३१ हजार ४४३ रुग्ण सापडले आहेत. आताही देशामध्ये ७३ असे जिल्हे आहेत जिथे दररोज १०० हून अधिक रुग्णांचे निदान होत आहे. मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमागे काही राज्ये देत असलेली जुनी माहिती हे महत्त्वाचे कारण आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज कोरोनामुळे २०२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधील १४३१ जुन्या मृत्यूंचा समावेश आहे. मध्य प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रानेसुद्धा गेल्या काही दिवसांपासून मृत्यूंची माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे एकूण मृतांमध्ये वाढ दिसून येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्ये ही कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवत होते. ते लपवलेले आकडे आता मुख्य आकडेवारीमध्ये समाविष्ट केले जात आहेत. महाराष्ट्रातूनही अशाप्रकारे जुने आकडे एकत्रित करून पाठवले जात आहेत. हेच धोरण बिहारनेही अवलंबले होते. 

Web Title: Coronavirus: Third Wave of Corona virus Don't Understand Weather Forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.