coronavirus: लसीकरणात जनतेचाही सहभाग खूप गरजेचा, केंद्रीय आरोग्य मंत्रालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 05:22 IST2020-12-09T05:22:15+5:302020-12-09T05:22:24+5:30
coronavirus: कोरोना लसीकरण ही फक्त केंद्र किंवा राज्य सरकारची जबाबदारी नाही तर यात जनतेचा सहभागही असणे खूप गरजेचे आहे,

coronavirus: लसीकरणात जनतेचाही सहभाग खूप गरजेचा, केंद्रीय आरोग्य मंत्रालय
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : कोरोना लसीकरण ही फक्त केंद्र किंवा राज्य सरकारची जबाबदारी नाही तर यात जनतेचा सहभागही असणे खूप गरजेचे आहे, असे सांगून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव भारत भूषण म्हणाले की, कोल्डचेनच्या तयारीचा भाग म्हणून पहिल्या टप्प्यात तीन कोटी हेल्थ आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाईल.
राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ‘कोविड शिल्ड’ आणि भारत बायोटेकने ‘कोव्हॅक्सिन’ आणि फायझरने आपल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज दिला आहे. देशात सहा लशींची मानवी चाचणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस विकसित करणाऱ्या औषधी कंपन्यांना भेट देऊन आढावा घेतला होता.
शास्त्रज्ञांकडून हिरवा कंदील मिळताच मोठ्या प्रमाणांवर लसीचे उत्पादन सुरु केले जाईल. उत्पादनसोबत कमी वेळेत प्रत्येकासाठी लस उपलब्ध होईल, यादृष्टीने व्यापक तयारी केली आहे. लसीकरण व्यवस्थापनासाठी या वर्षी ऑगस्टमध्ये राष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक स्थापन करण्यात आले
होते, असे राजेश भूषण यांनी सांगितले.
तज्ज्ञांचे पथक लोकसंख्या, लस खरेदी, लस वितरण आदी महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करीत आहेत. लसीकरणासाठी को-विन ॲपही तयार करण्यात आले. लस दिल्यानंतर डिजिलॉकरमध्ये लसीकरण प्रमाणपत्र येईल. लसीकरणात केंद्र आणि राज्यांसोबत जनतेचा सहभागही जरुरी आहे. शीतकरण साखळीच्या तयारीच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य आणि कोविड-१९ लढ्यातील अग्रणी कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले केले जाईल. देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४ लाखांहून कमी आहे. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या ४ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. नवीन रुग्ण आढळण्याचा दरही कमी होत आहे. देशातील पाच राज्यांत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५४ टक्के आहे. यात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, प. बंगाल आणि दिल्लीचा समावेश आहे. संसर्गीत रुग्णांच्या प्रमाणाबाबत बड्या देशांची तुलना केल्यास भारतात हे प्रमाण सात ते आठ पटीने जास्त आहे.
अन्य देशांनाही पुरवठा करण्यास सक्षम...
देशवासियांच्या गरजेनुसार लशीचे उत्पादन करण्यास भारत पूर्णत: सक्षम असून अन्य देशांची लसीचा पुरवठाही करण्यासही आपण सक्षम आहोत. आता प्रतीक्षा काही दिवसांचीच आहे, असे कोरोना कृती दलाचे चेअरमन आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.
९९ वर्षांच्या भवतारिणी समंता यांची कोरोनावर मात
हावडा : वयस्कर लोकांसाठी कोरोना हा फारच जीवघेऊ मानला जातो; परंतु जगण्याच्या तीव्र इच्छेतून वयोवृद्धही या महामारीवर विजय मिळवत आहेत. पश्चिम बंगालच्या भवतारिणी समंता यांचा १०० वा वाढदिवस काहीच महिने दूर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली; परंतु डॉक्टर आणि समंता यांच्या कुटुंबांतील सदस्यांना आश्चर्याचा धक्का देत भवतारिणी यांनी कोरोना विषाणूला पराभूत केले.
समंता यांना ९९ वर्षे ११ महिने या वयात ताप येऊद श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी फुलेश्वर भागातील कोविड-१९ रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यांची कोविड-१९ ची चाचणी केली गेली. त्यात त्या पॉझिटिव्ह निघाल्या.
रुग्णालयाचे संचालक शुभाशिष मित्रा म्हणाले की, समंता यांच्यावरील उपचारांसाठी डॉक्टरांची तुकडी तयार केली गेली. ‘वेळच्या वेळी काळजी घेतल्यामुळे त्या बऱ्या होत गेल्या. त्यांना आम्ही कोरोनातून मुक्त करू शकलो व १०० व्या वाढदिवसाआधी त्यांना घरी पाठवू शकलो याचा आनंद आहे.’
माेठा दिलासा : काेराेनाच्या २६,५६७ नव्या रुग्णांची नाेंद
नवी दिल्ली : काेराेनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट हाेत असून तब्बल १५१ दिवसांनी नव्या रुग्णांचा आकडा २७ हजारांच्या खाली आला आहे. देशभरात २६ हजार ५६७ नवे रुग्ण आढळले. तसेच मृतांच्या संख्येतही घट नाेंदविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडाही घटला आहे.
यापूर्वी १० जुलैला २६ हजार ५०६ नवे रुग्ण आढळले हाेते. त्यानंतर ११ जुलैला हा आकडा २७ हजारांच्या पुढे गेला हाेता. देशात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत घट व्हायला सुरुवात झाली हाेती. दिवाळीपूर्वी तीन नाेव्हेंबरला २८ हजार नवे रुग्ण आढळले हाेते. भारतात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत हाेती. दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वत्र माेठी गर्दी झाली हाेती. परिणामी, काेराेनाची रुग्णसंख्या वाढू लागली हाेती; परंतु सुमारे तीन आठवड्यांमध्येच नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले. मंगळवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली असून हा आकडा ३९ हजार ०४५ इतका नाेंदविण्यात आला. देशभरात एकूण ९१ लाख ७८ हजार रुग्ण बरे झाले असून १ लाख ४० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आता ३ लाख ८३ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.