CoronaVirus News: चिंताजनक! दहा दिवसांत दुप्पट रुग्ण; देशात २२ दिवसांनी एका दिवसातील सर्वाधिक वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 06:57 IST2021-02-21T01:26:27+5:302021-02-21T06:57:25+5:30
राज्यात ६,२८१ नवे कोराेनाचे रुग्ण; मुंबईतील १,३०५ इमारती सील

CoronaVirus News: चिंताजनक! दहा दिवसांत दुप्पट रुग्ण; देशात २२ दिवसांनी एका दिवसातील सर्वाधिक वाढ
नवी दिल्ली/मुंबई : लसीकरणाची मोहीम सुरु असतानाच देशात दररोज आढळून येणाऱ्या नव्या बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार शनिवारी देशात कोरोनाचे १३,९९३ नवे रुग्ण आढळले. एका दिवसात सुमारे १४ हजार नवे रुग्ण सापडण्याची घटना २२ दिवसांनंतर घडली आहे.
२९ जानेवारी रोजी कोरोनाचे १८,८५५ नवे रुग्ण आढळून आले होते. इकडे महाराष्ट्रातही आज ६,२८१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दहा दिवसांत नवे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. मुंबईतही रुग्ण आढळून आल्याने तेराशेहून अधिक इमारती सील कराव्या लागल्या आहेत.
महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये दररोज आढळणारे रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकारने चिंता
व्यक्त केली आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करायची असेल तर कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुंबईत लोकल पुन्हा सुरु केल्यानंतर सुरक्षा निर्बंधांच्या अंमलबजावणीत होत असलेली हलगर्जी रुग्णवाढीला कारणीभूत आहे, असे प्रशासनाने स्पष्टे केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह अमरावती आणि यवतवाळ जिल्ह्यांत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
देशामध्ये १०९७७३८७ कोरोना रुग्ण असून त्यातील १०६७८०४८ जण बरे झाले आहेत. शनिवारी कोरोनामुळे १०१ जण मरण पावले आहेत. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १४३१२७ आहे. देशातील कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या दीड लाखापेक्षा कमी असून त्यांचे प्रमाण १.२७ टक्के आहे. या आजारातून १ कोटी ६ लाख ७८ हजार जण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे. तर मृत्युदरात घट होऊन ते १.४२ टक्के झाले आहे.