CoronaVirus News second corona wave might reach its peak between 20 to 25th april predicts iit kanpur team | CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?, परिस्थिती नियंत्रणात कधी येणार? जाणून घ्या

CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?, परिस्थिती नियंत्रणात कधी येणार? जाणून घ्या

नवी दिल्ली: गेल्या महिनाभरापासून देशातील कोरोना रुग्णांच्या आकडा झपाट्यानं वाढत आहे. ५ एप्रिलला देशात पहिल्यांदा दिवसभरात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर पुढील १० दिवसांत हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक भीषण ठरत आहे. ही लाट नेमकी कधी ओसरणार आणि परिस्थिती कधी पूर्ववत होणार, असे प्रश्न संपूर्ण देशाला पडले आहेत. आयआयटी कानपूरमधील एका टीमनं गणिती मॉडेलच्या माध्यमातून कोरोना रुग्णसंख्या आणि रुग्णवाढीचा अभ्यास करून यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. (CoronaVirus News second corona wave might reach its peak between 20 to 25th april predicts iit kanpur team)

पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये देता येऊ शकते वेगवेगळी कोरोनाची लस? तज्ज्ञ सांगतात की....

देशातील कोरोनाची दुसरी लाट २० ते २५ एप्रिल दरम्यान शिखरावर असेल, अशी माहिती आयआयटी कानपूरच्या टीमनं दिली आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी दुसऱ्या लाटेबद्दल काही महत्त्वाचे अंदाज वर्तवले आहेत. 'दिवसाला दोन लाख कोरोना रुग्ण हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं शिखर असेल, असा आमचा अंदाज होता. २० ते २५ एप्रिल दरम्यान देशात दिवसाला २ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद होईल, असा आमचा होरा होता,' असं अग्रवाल म्हणाले.

मास्क लावूनही होऊ शकतो कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग; जर तुम्हीही करत असाल याच चुका

कोरोनाच्या लाटेचं शिखर नेमकं कधी येईल याचा अंदाज कसा बांधला जातो, या प्रश्नालादेखील अग्रवाल यांनी उत्तर दिलं. कोरोनाच्या काही विशेष गोष्टींचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवला जातो. यामध्ये दररोज होणारा कोरोनाचा फैलाव, लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये घालण्यात आलेले निर्बंध या प्रमुख बाबींचा समावेश असतो, असं अग्रवाल यांनी सांगितलं.

''मे महिन्यात स्थिती चांगली असेल''
२५ एप्रिलनंतर देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल, असा दिलासादायक अंदाज अग्रवाल यांनी वर्तवला. मे महिन्याच्या अखेरपर्यंत परिस्थितीत सुधारणा झालेली असेल. प्रत्येक राज्यात कोरोना लाटेचं शिखर वेगवेगळ्या कालावधीत येईल का, यावर २० ते २५ एप्रिल या कालावधीत मोठ्या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट शिखर गाठेल, असं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी आलेली कोरोनाची लाट आणि आता आलेली कोरोनाची दुसरी लाट यात एक प्रमुख फरक आहे. आता कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. प्रादुर्भाव जास्त आहे. पण त्या तुलनेत मृतांचा आकडा कमी आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला देशातील कोरोना रुग्णांचा आकडा खाली आला होता. लस उपलब्ध झाल्यानं लोक निर्धास्त झाले. त्यामुळेच कोरोनाचा फैलाव वाढला, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News second corona wave might reach its peak between 20 to 25th april predicts iit kanpur team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.