CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू; निधनानंतर धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 15:13 IST2021-04-30T15:11:08+5:302021-04-30T15:13:48+5:30
CoronaVirus News: आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाचा बळी; चिमुकलीच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त

CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू; निधनानंतर धक्कादायक माहिती समोर
रायपूर: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे देशाच्या अनेक राज्यांमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण असल्यानं अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं रुग्णालयानं उपचार नाकारल्यामुळे एका २ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या मुलीच्या मृत्यूनंतर तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं तिच्या कुटुंबियांना समजलं. हा प्रकार समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला.
राज्यात कोरोना लसींचा मोठा तुटवडा; ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला
दुर्ग जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे एका चिमुरडीला जीव गमवावा लागला. दोन वर्षांच्या मुलीला ताप आणि अतिसाराचा त्रास होत असल्यानं तिला दुर्गमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक तपासणीत तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. मुलीवर उपचार सुरू झाले. मात्र तिची प्रकृती सुधारली नाही. दुर्ग येथे व्हेंटिलेटर नसल्यानं डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना तिला रायपूरच्या पंडरी जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितलं.
...'त्या' व्यक्तींना कोरोना लसीचा एकच डोस पुरेसा; दुसऱ्या डोसची गरजच नाही
पंडरी जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यानंतर कुटुंबियांना जवळपास तासभर डॉक्टरांची वाट पाहिली. मात्र चिमुरडीला कोरोना असल्यानं त्यांनी व्हेंटिलेटर देण्यास नकार दिला. त्यांनी मुलीला मेकाहारा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मेकाहारातील रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी बेड उपलब्ध आहेत की नाही हे पाहण्यासाठी खूप वेळ घेतला. चिमुरडीच्या कुटुंबियांनी मुलीची प्रकृती बिघडत असून तिच्यावर उपचार सुरू करण्यासाठी विनंती केली. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचं ऐकलं नाही. अखेर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करण्याची तयारी दर्शवली. मात्र तोपर्यंत मुलीनं रुग्णवाहिकेत प्राण सोडला होता.
मुलीची प्राणज्योत मालवताच रुग्णवाहिकेच्या चालकानं तिचा मृतदेह रुग्णवाहिकेबाहेर आणून ठेवला आणि तो रुग्णवाहिका घेऊन निघून गेला. यानंतर कुटुंबियांनी मुलीला दुर्ग जिल्ह्यात आणलं. तिच्यावर अंत्यसंस्कार केले. अंत्यस्कार झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांना ४ तासांनी मोबाईलवर मुलीच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. तो निगेटिव्ह होता. मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्यानंच तिला रुग्णालयांमध्ये उपचार मिळाले नव्हते. मात्र प्रत्यक्षात तिला कोरोनाची लागण झालीच नव्हती. दुर्ग जिल्हा आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा एका चिमुरडीच्या जीवावर बेतला.