Coronavirus : जनता कर्फ्यू यशस्वी; डॉक्टर, नर्सेस, पोलिसांबद्दल कृतज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 04:45 IST2020-03-23T02:35:17+5:302020-03-23T04:45:38+5:30
Coronavirus : उत्स्फूर्तपणे थाळीनाद करून दिले समर्थन

Coronavirus : जनता कर्फ्यू यशस्वी; डॉक्टर, नर्सेस, पोलिसांबद्दल कृतज्ञ
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरातील नागरिकांनी ‘जनता कर्फ्यू’ला उत्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र धडपडत असलेले डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस तसेच आरोग्य खात्याचे कर्मचारी आदी सगळ््यांचे जनतेने रविवारी थाळीनाद करून तसेच टाळ््या वाजवून आभार मानले.
या भयावह संकटाला थोपविण्यासाठी केंद्र व विविध राज्य सरकारांनी रविवारच्या मध्यरात्रीपासून आणखी कडक निर्बंध व अधिक व्यापक उपाययोजना जाहीर केल्या. रविवारी सायंकाळी देशातील कोट्यवधी लोकांनी एकाच वेळी टाळ््या-थाळ््या वाजवून, शंखनाद करून व नगरपालिकांनी भोंगे वाचवून वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा सुरळित राहाव्यात यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र घटणाऱ्या लाखो सेवाव्रतींचे कृतज्ञापूर्वक आभार मानले.
कोरोना विषाणूची साथ व जनता कर्फ्यूसंदर्भात जागृती करणारी गाणी तयार केल्याबद्दल गायिका मालिनी अवस्थी, प्रीतम भरतवान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वट करून कौतुक केले व आभार मानले.