coronavirus: महाराष्ट्रासह ४ राज्यांत लॉकडाउन वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 06:57 IST2020-05-12T06:53:53+5:302020-05-12T06:57:33+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्यासह अर्धा डझन मुख्यमंत्र्यांनी छोट्या कालावधीसाठी का असेना लॉकडाऊन वाढवावा, असे मत व्यक्त केले.

coronavirus: महाराष्ट्रासह ४ राज्यांत लॉकडाउन वाढणार?
नवी दिल्ली : देशभर लागू असलेला लॉकडाऊन वाढविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्रासह पंजाब, बिहार व पश्चिम बंगालने केली. तामिळनाडूने रेल्वे व विमानसेवा ३१ मेपर्यंत सुरू करू नये, असे म्हटले. आंध्र प्रदेशने आधीच लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढविलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, तेव्हा या मागण्या केल्या गेल्या. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमधून १७ मे रोजी कसे बाहेर यायचे यासाठीची योजना तयार करण्याचे मोठे आव्हान केंद्र आणि राज्य सरकारांसमोर उभे आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्यासह अर्धा डझन मुख्यमंत्र्यांनी छोट्या कालावधीसाठी का असेना लॉकडाऊन वाढवावा, असे मत व्यक्त केले. इतरांना आर्थिक व्यवहारांना मुभा मिळावी, असे वाटते. दिल्लीसह काही राज्यांनी केंद्र सरकारने देशाची विभागणी कंटेनमेंट, रेड, आॅरेंज व ग्रीन झोन्समध्ये करण्याचा एकतर्फी घेतलेला निर्णय अयोग्य होता, असे म्हटले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना कंटेनमेंट झोन्स वगळता पूर्ण स्वरुपात आर्थिक व्यवहार सुरू व्हावेत, असे हवे आहे. केंद्र सरकारने घेतलेले एकतर्फी निर्णय आणि देशाची संघराज्य (फेडरल) रचना मोडल्याबद्दल पश्चिम बंगालने तिखट टीका केली. १२ मेपासून रेल्वेसेवा सुरू होत , पंतप्रधान मोदी यांची सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा
महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, दिल्ली आणि राजस्थानमध्ये देशातील सर्वात जास्त कोविड-१९ चे रुग्ण आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकूण रुग्णांच्या ४५ टक्के आहेत. सोमवारी कोविडचे ४३०० पेक्षा जास्त रुग्ण समोर आले. ही सगळ्यात मोठी संख्या आहे.
आर्थिक मदतीची मागणी
पंतप्रधान मोदी आणि वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यात ५४ दिवसांचा लॉकडाऊन १७ मे रोजी कसा मागे घेता येईल यावर सर्वात प्रदीर्घ काळ चाललेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा झाली. लॉकडाऊनमुळे उद्योग आणि सेवा सेक्टर्सला फार मोठा फटका बसला असल्यामुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी राज्यांनी आर्थिक पॅकेजची मागणी यावेळी केली. त्यावर मोदी म्हणाले की, ‘‘हळूहळू परंतु खात्रीने आम्ही आर्थिक घडामोडी होतील, अशा दिशेने जात आहोत.’’
स्थलांतरितांचे लोंढे काळजीचा विषय
श्रमिक रेल्वेतून स्थलांतरित मजुरांचे लोंढे इकडून तिकडे जातील आणि हजारोंच्या संख्येने विदेशातून लोक येणार आहेत हे सगळेच नव्या काळजीचे विषय आहेत. विदेशांतून येणाऱ्या या प्रवाशांना क्वारंटाईन केंद्रात किंवा घरी अलगीकरणात राहावे लागेल हा त्यांच्या काळजीचा विषय आहे.