coronavirus: "केरळ सरकारने कोरोनाबाधितांचे आकडे लपवले" गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 14:28 IST2020-07-13T14:24:26+5:302020-07-13T14:28:35+5:30
केरळ सरकारने तज्ज्ञांनी दिलेला कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला धुडकावून लावला आहे. तसेच केरळ सरकारकडून कोरोनाबाधितांचे खरे आकडे लपवण्यात आले आहेत

coronavirus: "केरळ सरकारने कोरोनाबाधितांचे आकडे लपवले" गंभीर आरोप
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र अशा स्थितीतही केरळने सुरुवातीपासूनच कोरोनाची आकडेवारी मर्यादित राखण्यात यश मिळवले आहे. मात्र आता केरळमधील कोरोनाच्या आकडेवारीवरून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. केरळमधील पिनराई विजयन सरकारने कोविड-१९ च्या रुग्णांचे आकडे लपवले, असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी केला आहे.
केरळमध्ये आतापर्यंक कोरोनाचे ७ हजार ८७३ रुग्ण सापडले असून, केवळ ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४०९५ रुग्णांनी कोरोनाला मात दिली असून, सध्या केरळमध्ये कोरोनाचे ३७४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जे. पी. नड्डा म्हणाले की, कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. केरळ सरकारने तज्ज्ञांनी दिलेला कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला धुडकावून लावला आहे. तसेच केरळ सरकारकडून कोरोनाबाधितांचे खरे आकडे लपवण्यात आले आहेत. तसेच संकटाच्या प्रसंगीही राजकारण केलं जात आहे, असा आरोप नड्डा यांनी केला. वंदे भारत मिशन अंतर्गत 1.21 लाख लोकांना केंद्र सरकारने केरळमध्ये आणले. मात्र या लोकांना केरळ सरकारकडून पुरेशी सुविधा पुरवण्यात आली नाही, अशी टीका नड्डा यांनी केली.
दरम्यान, नुकत्याच उघडकीस आलेल्या सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणावरूनही नड्डा यांनी विजयन यांच्यावर निशाणा साधला आहे. येथे सोन्याचा रंग सुद्धा लाल झाला आहे. तसेच केरळ सरकार हे भ्रष्ट, अप्रभावी आणि हिंसाचारावर विश्वास ठेवणारे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
निधी हडपणे, दलित आणि महिलांवर अत्याचार करणे, राजकीय नियुक्त्यांमध्ये घराणेशाही आणि राजकीय संरक्षण या विजयन सरकार मधील खूप सामान्य बाबी बनल्या आहेत. हे सरकार केवळ अक्षम नाही तर भ्रष्टसुद्धा आहे. हे हिंसेवर विश्वास असणारे लोक आहेत. गेल्या दोन दशकात केरळमध्ये भाजपाच्या २७० कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप. नड्डा यांनी यावेळी केला.