पुन्हा तोंड वर काढतोय कोरोना! महाराष्ट्रात 66, यूपीमध्ये 10 नवे रुग्ण; देशात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:48 IST2025-05-28T12:47:16+5:302025-05-28T12:48:16+5:30
आरोग्य मंत्रालयाने २६ मे पर्यंतचा डेटा अपडेट केला होता. त्यात, देशात १०१० सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या संख्येत वाढ झाली आहे.

पुन्हा तोंड वर काढतोय कोरोना! महाराष्ट्रात 66, यूपीमध्ये 10 नवे रुग्ण; देशात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू
देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागले आहेत. दररोज कोविडचे रुग्ण आढळत आहेत. बुधवारी सकाळपर्यंत भारतात १०४७ सक्रिय रुग्ण आढळले. महाराष्ट्रात ६६ आणि उत्तर प्रदेशात १० नवीन रुग्ण आढळले आहेत. कोविड १९ मुळे मृतांचा आकडाही ११ वर पोहोचला आहे. देशात कोविडसाठी तयारी सुरू झाली आहे. अनेक राज्यांनी रुग्णालयांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
आरोग्य मंत्रालयाने २६ मे पर्यंतचा डेटा अपडेट केला होता. त्यात, देशात १०१० सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात ६६ नवीन रुग्ण आढळले आहेत, यांपैकी ३१ रुग्ण मुंबई शहरातील आहेत. येथील एकूण सक्रिय रुग्णांसंदर्भात बोलायचे झाल्यास, हा आकडा ३२५ वर पोहोचला आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये तयारीही सुरू झाली आहे. जेजे रुग्णालयात १५ बेडचा आयसोलेशन वॉर्डही तयार करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातही वाढली संख्या -
उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. २६ मे पर्यंत येथे १५ सक्रिय रुग्ण होते. हा आकडा आता १० ने वाढला आहे. गाझियाबादमध्येही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली असून १३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर एक जण रुग्णालयात दाखल आहे. गाझियाबादमध्ये ४ महिन्यांचे एक बाळही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. राज्यातील रुग्णालयांना कोरोनासंदर्भात सतर्क राहण्यास सांग आले आहे.
राजस्थानमध्येही पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचे एकूण ७ नवीन रुग्ण आढून आले आहेत. जोधपूरमध्येही रुग्ण आढळून आले आहे. येथे एका नवजात बाळासह अनेक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.