Coronavirus: महाराष्ट्रासह यूपी, दिल्लीमध्ये कोरोनाची लाट ओसरली, आता या राज्यांमध्ये वाढतोय धोका, तज्ज्ञांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 18:57 IST2021-05-19T18:28:37+5:302021-05-19T18:57:56+5:30
Coronavirus in India: गणितीय आकडेमोडीमधून तज्ज्ञांनी याबाबतची माहिती दिली आहे. SUTRA मॉडेलने पुढील सहा ते आठ महिन्यांदरम्यान देशात कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट येईल, अशी शक्यताही वर्तवली आहे.

Coronavirus: महाराष्ट्रासह यूपी, दिल्लीमध्ये कोरोनाची लाट ओसरली, आता या राज्यांमध्ये वाढतोय धोका, तज्ज्ञांचा इशारा
नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यातल्यात्यात दिलासादायक बाब म्हणजे देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची लाट आता ओसरली आहे. (Coronavirus in India) मात्र अद्यापही अनेक राज्यांम्ये कोरोनाच्या संसर्गाचा पीक येणे बाकी आहे. याबाबत आयआयटीच्या तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. (Coronavirus wave subsided in Maharashtra, UP, Delhi, now the threat is increasing in Tamil nadu, Punjab, Assam, experts warn)
गणितीय आकडेमोडीमधून तज्ज्ञांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार तामिळनाडू, पंजाब आणि आसाममध्ये कोरोनाच्या संसर्गाने शिखर गाठणे अद्याप बाकी आहे. याबाबतचा अंताज SUTRA मॉडेलच्या माध्यमातून बांधण्यात आला आहे. दरम्यान, SUTRA मॉडेलने पुढील सहा ते आठ महिन्यांदरम्यान देशात कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट येईल, अशी शक्यताही वर्तवली आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनीही कोरोनाच्या येणाऱ्या पीकबाबत अंदाज वर्तवला आहे.
या गणितीय मॉडेलच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की, दिल्ली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाच्या लाटेचा जोर ओसरला आहे. मात्र तामिळनाडू, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि आसाममध्ये कोरोनाच्या लाटेने शिखर गाठणे अद्याप बाकी आहे. या मॉडेमधील अंदाजानुसार तामिळनाडूमधील कोरोनाच्या संसर्गाचा पीक २९ ते ३१ मेच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. तर पुदुच्चेरीमध्ये १९ ते २० मे दरम्यान पीक येईल. तर आसाममध्ये २० ते २१ मे दरम्यान कोरोनाचा पीक येण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील राज्यांचा विचार केल्यास हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. पंजाबमध्ये २२ मे आणि हिमाचल प्रदेशमध्ये २४ मेपासून कोरोनाचा पीक दिसून येईल.
मात्र महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि गोवा या राज्यांमध्ये कोरोनाची लाट ओसरली आहे. येथील रुग्णसंख्येत सातत्याने घट दिसून येत आहे.