नवी दिल्लीः कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणात देशावर घोंघावत असून, रुग्णांची संख्यासुद्धा दिवसागणिक वाढत चालली आहे. केंद्र आणि राज्य सरकारही कोरोनाला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आरोग्य कर्मचारी गल्लीबोळात जाऊन जनतेची तपासणी करत आहेत. परंतु असं करत असताना काही डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याची मोदी सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून, बैठकीत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सांगितले की, या महारोगराईपासून देशाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दुर्दैवाने लोकांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. पण त्यांच्यावरील हल्ले आम्ही खपवून घेणार नाही. डॉक्टरांविरोधात हिंसाचार किंवा अशी कोणतीही घटना घडल्यास संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
CoronaVirus : खबरदार! आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा; मोदी सरकारचा अध्यादेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 15:57 IST