CoronaVirus : खबरदार! आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा; मोदी सरकारचा अध्यादेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 03:34 PM2020-04-22T15:34:46+5:302020-04-22T15:57:37+5:30

आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून, बैठकीत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

CoronaVirus : Assaulting health workers is now a non-bailable offense; Modi government's ordinance vrd | CoronaVirus : खबरदार! आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा; मोदी सरकारचा अध्यादेश

CoronaVirus : खबरदार! आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा; मोदी सरकारचा अध्यादेश

Next

नवी दिल्लीः कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणात देशावर घोंघावत असून, रुग्णांची संख्यासुद्धा दिवसागणिक वाढत चालली आहे. केंद्र आणि राज्य सरकारही कोरोनाला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आरोग्य कर्मचारी गल्लीबोळात जाऊन जनतेची तपासणी करत आहेत. परंतु असं करत असताना काही डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याची मोदी सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून, बैठकीत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सांगितले की, या महारोगराईपासून देशाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दुर्दैवाने लोकांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. पण त्यांच्यावरील हल्ले आम्ही खपवून घेणार नाही. डॉक्टरांविरोधात हिंसाचार किंवा अशी कोणतीही घटना घडल्यास संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

यासाठी एक अध्यादेश काढण्यात आला असून, तो राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर लागू केला जाणार असल्याचंही जावडेकरांनी स्पष्ट केलं आहे. आता वैद्यकीय पथकावर हल्ला केल्यास 3 महिन्यांपासून 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होणार आहे. तसेच 50,000 ते 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. जर गंभीर नुकसान झाले तर 6 महिन्यांपासून 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच 1 लाख ते 5 लाख रुपये दंड करण्याची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.  जावडेकर म्हणाले की, महारोगराई कायदा 1897मध्ये दुरुस्ती करून हा अध्यादेश लागू केला जाणार आहे. आरोग्य पथकावर हल्ला करण्यासारखा गुन्हा केल्यास तो अजामीनपात्र ठरणार आहे. त्या प्रकरणाची  30 दिवसांत चौकशी केली जाणार असून, दोषी आढळल्यास आरोपीला तीन महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

Read in English

Web Title: CoronaVirus : Assaulting health workers is now a non-bailable offense; Modi government's ordinance vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.