Coronavirus: देशात कोरोनाचे नवे ४०,९५३ कोरोना रुग्ण; २४ तासांत १८८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 04:37 IST2021-03-21T04:36:43+5:302021-03-21T04:37:01+5:30
देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १५ लाख ५५ हजार २८४ इतकी झाली आहे तर एकूण १ कोटी ११ लाख ७ हजार ३३२ जण या संसर्गातून बरे झाले आहेत.

Coronavirus: देशात कोरोनाचे नवे ४०,९५३ कोरोना रुग्ण; २४ तासांत १८८ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शनिवारी देशात ४० हजार ९५३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर १८८ जणांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. शुक्रवारी देशात ३९ हजार ७२६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते.
देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १५ लाख ५५ हजार २८४ इतकी झाली आहे तर एकूण १ कोटी ११ लाख ७ हजार ३३२ जण या संसर्गातून बरे झाले आहेत. देशात या संसर्गाने आतापर्यंत १ लाख ५९ हजार ५५८ जणांचा बळी घेतला आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२६ टक्के इतके आहे तर मृत्यूचे प्रमाण १.३८ टक्के इतके आहे. देशात सध्या २ लाख ८८ हजार ३९४ इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. ही संख्या एकूण रुग्णांच्या २.३६ टक्के इतकी आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २३ कोटी २४ लाख ३१ हजार ५१७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. शुक्रवारी एका दिवसात १०.६० लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
४.११ कोटी जणांना दिली लस
देशात कोरोना लसीकरणाने आता वेग घेतला आहे. आतापर्यंत देशात ४ कोटी ११ लाख ५५ हजार ९७८ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. यातील १८ लाख १६ हजार १६१ जणांना शुक्रवारी लस देण्यात आली. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी सरकारी रुग्णालयांसोबत खासगी रुग्णालयांनाही लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.