Corona Virus Vaccine: Gennova will have the country's first 'MRNA' based vaccine | Corona Virus Vaccine : देशातील पहिली ‘एमआरएनए’ आधारीत लस 'जिनोव्हा'ची असणार

Corona Virus Vaccine : देशातील पहिली ‘एमआरएनए’ आधारीत लस 'जिनोव्हा'ची असणार

पुणे : जिनोव्हा बायोफार्मा या कंपनीकडून कोरोनावर देशातील पहिले ‘एमआरएनए’ या तंत्रज्ञानावर आधारीत ‘एजीसी०१९’ ही लस विकसित केली जात आहे. वर्षअखेरीस या लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. ही लसीची २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात साठवणुक करता यावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लस प्रत्यक्षात आल्यानंतर त्याचे वितरण व साठवणुक करणे सहज शक्य होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन लसीच्या उत्पादनासह वितरण, चाचण्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. तर सोमवारी जिनोव्हा बायोफार्मा या कंपनीकडून तयार केल्या जात असलेल्या लसीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माहिती घेतली. अमेरिकेतील सिअ‍ॅटेल येथील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने जिनोव्हाकडून ही लस विकसित केली जात आहे. हिंजवडी येथील कंपनीच्या प्रयोगशाळेस १०० देशांतील राजदुतांच्या भेटीचे नियोजनही सुरू आहे. दरम्यान, कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, जिनोव्हाकडून या आव्हानात्मक परिस्थितीत वेगाने काम सुरू असून या लसीच्या मानवी चाचण्यांना वर्षअखेरीस सुरूवात होणार आहे. लवकर मान्यता मिळाल्यास त्याआधाही सुरूवात होऊ शकते.

भारतात विकसित होत असलेल्या बहुतेक लसी विषाणुतील प्रोटीन्सचा आधार असलेल्या आहेत. तर जिनोव्हाची लस ‘एमआरएनए’ वर आधारलेली आहे. या पध्दतीमुळे लस बनविण्याचा कालावधी अत्यंत कमी होऊ शकतो. तसेच त्याचे उत्पादनही वेगाने करता येऊ शकतो.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, ‘ही लस २ ते ८ अंश सेल्सिअसदरम्यान साठविता येऊ शकते. त्यादृष्टीने सुरूवातीपासूनच वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. या लसीच्या चाचण्यांना केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने निधी दिला आहे. मानवी चाचण्यांना मान्यतेसाठी भारतीय नियामक संस्थेकडे परवानगी मागितली आहे. या चाचण्या मार्चपर्यंत पुर्ण होतील. ‘एमआरएनए’ वर आधारलेल्या लसीच्या भारतातील या पहिल्या मानवी चाचण्या असतील.’ 
------------
‘एमआरएनए’ आधारीत या लसीद्वारे कोरोना संक्रमित शरीरातील पेशींना विषाणूंशी लढा देण्यास सक्षम अशी प्रतिजैवके तयार करण्यास सज्ज केले जाते. एमआरएनए रचनेमुळे ही लस दीर्घ काळ प्रतिजैवके निर्मितीसाठी पुरक ठरते. तसेच विपरीत परिणामांची शक्यता कमी होते, असा कंपनीचा दावा आहे.
-----------

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Virus Vaccine: Gennova will have the country's first 'MRNA' based vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.