Corona Virus Vaccine: कोविशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारकच : ‘सिरम’चे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 17:08 IST2020-12-01T17:07:32+5:302020-12-01T17:08:21+5:30
'कोविशिल्ड' ही कोरोनावरील लस असुरक्षित असल्याचा धक्कादायक आरोप चेन्नई येथील एका स्वयंसेवकाच्या पत्नीने केला होता.

Corona Virus Vaccine: कोविशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारकच : ‘सिरम’चे स्पष्टीकरण
पुणे : कोविशिल्ड ही कोरोनावरील लस असुरक्षित असल्याचा चेन्नई येथील एका स्वयंसेवकाने केलेला धक्कादायक आरोप सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने फेटाळून लावला आहे. ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी असल्याचा खुलासा संस्थेने केला आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीच्या भारतातील मानवी चाचण्या सिरम इन्स्टिट्युटमार्फत सुरू आहेत. तसेच या लसीचे उत्पादनही सिरमकडून सुरू करण्यात आले आहे. चेन्नई येथील एका ४० वर्षीय स्वयंसेवकाच्या पत्नीने ही लसीमुळे मेंदुविषयक समस्या निर्माण झाल्याचा आरोप करून कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच लसीची चाचणी व उत्पादन थांबविण्यासह पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाईही मागितली आहे. ‘सिरम’ने हे आरोप फेटाळले असून त्याबाबतचा खुलासा मंगळवारी दिला आहे.
‘कोविशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारक आहे. चेन्नईच्या स्वयंसेवकासोबत घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण लसीमुळे हा प्रकार झालेला नाही. त्यांच्या वैद्यकीय स्थितीबद्दल सहानुभुती आहे. चाचणीसाठी सर्व आवश्यक नियम, नैतिक प्रक्रिया आणि नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. ही घटना लसीच्या चाचणीशी संबंधित नसल्याचे संबंधित नियामक संस्थांनी स्पष्ट केले आहे. या घटनेशी संबंधित सर्व माहिती भारतीय औषध महानियंत्रकांनाही दिली आहे. सर्व आवश्यक प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर चाचण्या सुरू ठेवल्या आहेत. लस पुर्णपणे सुरक्षित व रोगप्रतिकारक असल्याचे सिध्द झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणावर वापरासाठी दिली जाणार नाही, याची खात्री देतो. स्वयंसेवकाचे आरोप कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहचविणारे असल्याने कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे,’ असे सिरमककडून स्पष्ट करण्यात आले आहे.