Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 10:35 IST2025-05-24T10:34:38+5:302025-05-24T10:35:28+5:30
Corona Virus : भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे.

Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (२३ मे २०२५) गुजरातमध्ये २०, हरियाणामध्ये ५, उत्तर प्रदेशात ४ नवीन रुग्ण आढळले. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये ९ महिन्यांचं बाळ कोरोना पॉझिटिव्ह आलं आहे. देशभरात आतापर्यंत एकूण ३१२ एक्टिव्ह रुग्ण आहेत, तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. धोका वाढत असल्याचे पाहून दिल्लीमध्ये लोकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिल्ली सरकारने म्हटलं आहे की, सर्व रुग्णालयांनी बेड, ऑक्सिजन, औषधे आणि लसींची पूर्ण व्यवस्था करावी. तसेच, रुग्णालयांना प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी लोकनायक रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि सर्व संस्था त्यांचे रिपोर्ट दररोज आरोग्य डेटा पोर्टलवर अपलोड करतील. "आतापर्यंत २३ कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि हे सर्व रुग्ण खासगी लॅबमधून आले आहेत. हे लोक दिल्लीचे रहिवासी आहेत की बाहेरून आले आहेत याची पुष्टी केली जात आहे" अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री पंकज सिंह यांनी दिली आहे.
बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
गुजरातमधून आतापर्यंत एकूण ४० रुग्ण नोंदवले गेले आहेत आणि त्यापैकी ३३ एक्टिव्ह आहेत. हरियाणामधून ५ रुग्ण समोर आले आहेत, ज्यामध्ये दोन महिला आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्येही ४ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ३ रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
कोरोनाचे आकडे सतत बदलत आहेत, शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने २५७ एक्टिव्ह रुग्णांची माहिती दिली होती. राजस्थानमध्ये दोन, सिक्कीममध्ये एक, महाराष्ट्रात ५६, केरळमध्ये ९५, पश्चिम बंगालमध्ये एक, कर्नाटकमध्ये १६, पुद्दुचेरीमध्ये १० आणि तामिळनाडूमध्ये ६६ रुग्ण आढळले आहेत. दोन जणांचा मृत्यूही झाला आहे.
कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
आंध्र प्रदेश आरोग्य विभागाने नागरिकांना प्रार्थना सभा, पार्टी, लग्नसमारंभ किंवा सामाजिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने एकत्र येणं टाळण्यास सांगितलं आहे. बस स्टॉप, रेल्वे स्थानके आणि विमानतळ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितलं. ज्या प्रवाशांनी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत अशा देशांना भेट दिली आहे त्यांनाही टेस्ट करण्यास सांगण्यात आलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट जेएन-१ शी संबंधित काही प्रकरणं आढळल्यानंतर झारखंडचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.