Corona Virus: ओमायक्रॉनच्या या व्हेरिएंटने भारतात वाढवला धोका, WHO चिंतीत, दिला असा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 00:04 IST2023-03-30T00:04:20+5:302023-03-30T00:04:43+5:30
Corona Virus In India: या व्हेरिएंटचे जगामध्ये आतापर्यंत ८०० सिक्वेन्स मिळाले आहेत. त्यामधील सर्वाधिक भारतातच सापडले आहेत. भारतामध्ये या व्हेरिएंटने इतर सर्व व्हेरिएंटना कमकुवत केले आहे.

Corona Virus: ओमायक्रॉनच्या या व्हेरिएंटने भारतात वाढवला धोका, WHO चिंतीत, दिला असा इशारा
भारतातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते सध्या संपूर्ण जगामध्ये ओमायक्रॉनने कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ केली आहे. संपूर्ण जगात ओमायक्रॉनचे ८०० हून अधिक लिनिएज अस्तित्वात आहेत. मात्र भारतामध्ये जो विषाणू सर्वाधिक दिसून येत आहे तो ओमायक्रॉनचाच एक व्हेरिएंट XBB. 1.16 हा आहे.
या व्हेरिएंटचे जगामध्ये आतापर्यंत ८०० सिक्वेन्स मिळाले आहेत. त्यामधील सर्वाधिक भारतातच सापडले आहेत. भारतामध्ये या व्हेरिएंटने इतर सर्व व्हेरिएंटना कमकुवत केले आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार कोरोना आतापर्यंत कमकुवत व्हायला पाहिजे होता. मात्र असं घडलेलं नाही. तसेच तो वेगाने फैलावत आहे, ही चिंतेची मोठी बाब आहे. मात्र तो म्युटेट होऊन अधिक धोकादायक बनू नये यासाठी जगातील सर्व देशांनी आपली तयारी पूर्ण करून ठेवली पाहिजे.
दरम्यान, गेल्या काही काळापसून जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. चीनमध्ये डिसेंबर महिन्यात केवळ २० दिवसांमध्ये कोरोनाचे २५० दशलक्षांहून अधिक रुग्ण सापडले होते. भारतासह जगभरामध्ये कोरोनाच्या नव्या लाटेची भीती कायम आहे. यूएस सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन च्या म्हणण्यानुसार ओमायक्रॉन विषाणूचा बीएफ.७ व्हेरिएंट चीन आणि भारतात चिंता वाढवत आहे. तर अमेरिकेत ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट एक्सबीबी कोविड १९ च्या रुग्णांमध्ये झालेल्या १८.३ टक्के वाढीसाठी कारणीभूत आहे.