हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर आता भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे, ज्यामुळे चिंता वाढत आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला वेळीच योग्य पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, असे आजार वेगवेगळ्या स्वरूपात येतात, त्यामुळे सरकारने त्यांच्या आरोग्य, वैद्यकीय आणि माहिती तंत्राचा चांगला वापर करावा जेणेकरून लोकांमध्ये भीती पसरू नये. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत पोस्ट करून अखिलेश यांनी सरकारला कोरोनाच्या धोक्याबद्दल इशारा दिला आहे.
"धोक्याची घंटा वाजण्यापूर्वी सरकार कोरोना नियंत्रित करण्यासाठी आणि रोखण्यासाठी वेळीच सतर्क राहील, जेणेकरून गेल्या वेळी झालेल्या निष्काळजीपणा आणि गैरव्यवस्थापनाच्या चुका पुन्हा होऊ नयेत. भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी ठरते. आता कोरोनाची ती लसही अयशस्वी ठरली आहे, ज्यांचे प्रमाणपत्र मोठ्या संख्येने वाटले गेले होते, म्हणूनच यावेळी आणखी सतर्क राहण्याची गरज आहे."
कोरोना रिटर्न्स! 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, पाहा कुणाला सर्वाधिक धोका
"आपल्या सर्वांना जनतेला हे समजावून सांगावं लागेल की सध्या कोरोनाची परिस्थिती फारशी गंभीर नसली तरी त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, कारण असे आजार बदललेल्या स्वरूपात येतात. म्हणून, सरकारने आपल्या आरोग्य-वैद्यकीय आणि माहिती तंत्राचा चांगला वापर करावा आणि जनतेमध्ये कोरोनाची भीती पसरू देऊ नये" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचा भारतातही प्रसार होत आहे. भारतात त्यांची संख्या अजूनही कमी आहे. पण, जर आपण आंतरराष्ट्रीय ट्रेंड पाहिला तर रुग्ण वाढू शकतात. १९ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाचे २५७ एक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी बहुतेकांना रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज नाही. परंतु, तज्ज्ञांच्या मते, जर आताच पावलं उचलली गेली नाहीत तर देश पुन्हा एकदा कोरोनाला बळी पडू शकतो. त्यामुळे सरकार आणि जनतेने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.