Corona Vaccine : भारीच! "कोरोना लस घ्या आणि सोन्याची नाणी, स्कूटी, वॉशिंग मशीनसह भरपूर गिफ्ट्स मिळवा" 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 02:58 PM2021-06-08T14:58:10+5:302021-06-08T15:08:49+5:30

Corona Vaccine : कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत.

Corona Vaccine free gifts gold coins scotty getting on covid 19 vaccine in chennai | Corona Vaccine : भारीच! "कोरोना लस घ्या आणि सोन्याची नाणी, स्कूटी, वॉशिंग मशीनसह भरपूर गिफ्ट्स मिळवा" 

Corona Vaccine : भारीच! "कोरोना लस घ्या आणि सोन्याची नाणी, स्कूटी, वॉशिंग मशीनसह भरपूर गिफ्ट्स मिळवा" 

googlenewsNext

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 2,89,96,473 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 86,498 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2123 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,51,309 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. 

देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. अशीच एक घटना चेन्नईमध्ये घडली आहे. कोवलम भागातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी एका सेवाभावी संस्थेने लोकांना भन्नाट ऑफर दिली आहे, कोवलममध्ये एका सेवाभावी संस्थेच्या वतीने लस घेणाऱ्यांना एक प्लेट बिर्याणी आणि मोबाईल रिचार्जचं कूपन दिलं जात आहे. याशिवाय दर आठवड्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून नागरिकांना सोन्याची नाणी, मिक्सर, स्कूटी, वॉशिंग मशीन अशा महागड्या गोष्टीही जिंकता येत आहेत. 

बक्षिसांसाठी अट फक्त एकच आहे ती म्हणजे कोरोना लस घेतली पाहिजे. कोवलम या भागाची लोकसंख्या साधारण 14,300 इतकी आहे. यामध्ये 18 वर्षांवरील वयोगटातले 6400 जण आहेत. या संस्थेचं म्हणणं आहे की अशा योजनांमुळे लस घेण्यासाठीची प्रेरणा मिळत आहे. या गावातील लोकांमध्ये लसीकरणाबाबत प्रचंड भीती आहे. त्यामुळे या गावातलं लसीकरण संथ गतीने सुरू होतं. सुरुवातीच्या काळात लसीकरण केंद्रांवर केवळ 50 ते 60 जण उपस्थित असायचे. मात्र, या संस्थेने नव्या योजनेची सुरुवात केल्यानंतर मात्र लस घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. 

एका आठवड्यातच 650 हून अधिक लोकांनी कaरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 700 हून अधिक जणांची नोंदणी झालेली आहे. लोकांनी सांगितलं की लसीकरणाबद्दल पूर्वी आमच्या मनात संभ्रम होता. पण या संस्थेने सगळे गैरसमज दूर केले आहेत. आता आम्ही सहपरिवार जाऊन लस घेत आहोत. कोवलम भागाला कोरोनामुक्त करण्यासाठी एसटीएस फाऊंडेशन, सीएन रामदास ट्रस्ट आणि संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. राजीव फर्नांडो यांनी स्थापन केलेल्या न्यूयॉर्कच्या चिराग या संस्थेने पुढाकार घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Corona Vaccine free gifts gold coins scotty getting on covid 19 vaccine in chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.