Surajkund Fair Accident: एकीकडे संपूर्ण कुटुंब त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तयारी करत होते, तर दुसरीकडे नियतीने वेगळाच डाव मांडला होता. फरीदाबाद येथील प्रसिद्ध सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तशिल्प मेळाव्यात एका जॉयराईडचा अपघात रोखताना आणि लोकांचे प्राण वाचवताना हरियाणा पोलिसांचे निरीक्षक जगदीश प्रसाद (५८) यांना वीरमरण आले. त्यांच्या या शौर्यामुळे संपूर्ण पोलीस दलात आणि त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.
शनिवारी संध्याकाळी ६:१५ च्या सुमारास सूरजकुंड मेळाव्याच्या मैदानात त्सुनामी नावाचा मोठा पाळणा अचानक तांत्रिक बिघाडामुळे एका बाजूला झुकला. पाळणा हवेतच तुटून जमिनीवर कोसळणार असल्याचे पाहून पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला. तिथे तैनात असलेले निरीक्षक जगदीश प्रसाद यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीसाठी धाव घेतली. ते लोकांना सुरक्षित बाहेर काढत असतानाच पाळण्याचा एक मोठा भाग त्यांच्या डोक्यावर आणि तोंडावर कोसळला. या भीषण अपघातात १९ जण जखमी झाले, परंतु प्रसाद यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्यनिष्ठा
गंभीर जखमी झालेल्या प्रसाद यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जगदीश प्रसाद १९८९ मध्ये हरियाणा सशस्त्र पोलीस दलात दाखल झाले होते. त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल २०१९-२० मध्ये त्यांना राज्यपाल पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. अवघ्या एका महिन्यानंतर ते पोलीस दलातून निवृत्त होणार होते.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
रविवारी उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ देंगर गावी पूर्ण राज्य सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरियाणा पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. हे तिन्ही मुले सध्या शिक्षण घेत आहेत.
शासनाची मोठी घोषणा
हरियाणाचे पोलीस महासंचालक अजय सिंघल यांनी जगदीश प्रसाद यांच्या बलिदानाची दखल घेत महत्त्वाची घोषणा केली आहे. निरीक्षक जगदीश प्रसाद यांना हुतात्मा दर्जा देण्यात येणार आहे. त्यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात येईल. "जगदीश प्रसाद यांचे जाणे हे पोलीस दलाचे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. शेवटच्या क्षणी त्यांनी दाखवलेले धाडस हे प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यासाठी प्रेरणादायी आहे," असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Summary : Inspector Jagdish Prasad heroically saved 19 lives at Surajkund fair. A joyride malfunctioned, and he shielded people, sacrificing himself. He was due to retire soon. The state honors his service.
Web Summary : इंस्पेक्टर जगदीश प्रसाद ने सूरजकुंड मेले में बहादुरी से 19 लोगों की जान बचाई। एक जॉयराइड में खराबी आई, और उन्होंने लोगों को बचाते हुए अपनी जान दे दी। वह जल्द ही सेवानिवृत्त होने वाले थे। राज्य उनकी सेवा का सम्मान करता है।