बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:42 IST2025-12-06T12:38:33+5:302025-12-06T12:42:36+5:30
West Bengal : तृणमूल कांग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर हे बंगालमध्ये बाबरी मशिदीची उभारणी करण्याची घोषणा करून सध्या चर्चेत आले आहेत.

बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक
तृणमूल कांग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर हे बंगालमध्ये बाबरी मशिदीची उभारणी करण्याची घोषणा करून सध्या चर्चेत आले आहेत. ‘सारं काही सुरळीत सुरू आहे. तसेच दुपारी १२ पर्यंत वाट पाहा. दुपारी १२ वाजता कुराण पठण केलं जाईल. त्यानंतर पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, त्यासाठी आमचे समर्थक विटा घेऊन निघाले आहेत’, असे हुमायूं कबीर यांनी सांगितले.
हुमायूं कबीर यांच्या समर्थकांनी विटा घेऊन आगेकूच सुरू केल्याचे फोटोही समोर आले आहेत. आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य मिळत आहे मुर्शिदाबाद पोलीस आणि राज्य पोलीस या कार्यक्रमासाठी आम्हाला पूर्ण सहकार्यं करत आहेत, त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो, असेही हुमायूं कबीर म्हणाले.
हुमायूं कबीर यांनी बाबरी मशिदीची पायाभरणीची तयारी केल्याने आता त्याबाबत राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनी कबीर यांच्यावर थेट हल्ला करत हुमायूं कबीर यांच्यासारखे नेते राजकीय लाभासाठी अशी पावलं उचलत आहेत, असा आरोप केला. हा सर्व मुस्लिम व्होट बँक मिळवण्यासाठीचा प्रयत्न आहे, तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत लढाईमुळे अशी परिस्थिती निर्माण होत आहे, असेही दिलीप घोष म्हणाले.