मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 12:23 IST2025-09-07T12:22:36+5:302025-09-07T12:23:24+5:30
Kerala News: केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये मुथुपिलक्क येथे असलेल्या पार्थसारथी मंदिराच्या आवारात सजवण्यात आलेल्या पुकलम (फुलांची रांगोळी)वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर समितीने अशी रांगोळी काढणं म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.

मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये मुथुपिलक्क येथे असलेल्या पार्थसारथी मंदिराच्या आवारात सजवण्यात आलेल्या पुकलम (फुलांची रांगोळी)वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर समितीने अशी रांगोळी काढणं म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी आरएसएसच्या २७ स्वयंसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रांगोळीमधून ऑपरेशन सिंदूर आणि भगव्या ध्वजाचं चित्र रेखाटण्यात आलं होतं.
मंदिर समितीने सांगितले की, या रांगोळीमधून आरएसएसचा झेंडा आणि ऑपरेशन सिंदूरचं नाव तयार करणं म्हणजे मंदिर परिसरात तिरंगा किंवा अन्य कुठल्याही सजावटीला देण्यात आलेल्या स्थगितीविरोधातील कृती आहे. हे निर्बंध २०२३ साली सातत्याने होणाऱ्या राजकीय वादानंतर उच्च न्यायालयाने लागू केले होते.
मंदिर समितीचे सदस्य मोहनन यांनी याबाबत की, सण उत्सवांवेळी झेंड्यावरून सातत्याने वाद व्हायचे. त्यामुळे मंदिराच्या आसपास कुठलाही झेंडा किंवा सजावट करण्यात येऊ नये, असे आदेश आम्ही न्यायालयाकडून आणले होते. असं असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मंदिर समितीने केलेल्या फुलांच्या सजावटीजवळच वेगळ्या रांगोळीच्या माध्यमातून आपला भगवा झेंडा आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव काढले होते. हे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं उल्लंघन असल्याने आम्ही याबाबत तक्रार दिली. आम्ही ऑपरेशन सिंदूरचा पूर्णपणे सन्मान करतो. मात्र आरोपी दाखवताहेत तसं हे प्रकरण नाही आहे.
दरम्यान, कोल्लम जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २७ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल होणे ही धक्कादायक बाब असल्याची प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे. केरळमध्ये जमात ए इस्लामीचं राज्य आहे की पाकिस्तानचं असा सवाल भाजपाचे केरळमधील प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे. तसेच गुन्हे मागे न घेतल्यास कोर्टात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.