"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:53 IST2025-08-14T18:51:58+5:302025-08-14T18:53:37+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते, "जर आपण आमचे पाणी रोखण्याची धमकी द्याल, तर पाकिस्तानचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकणार नाही. जर भारताने असे काही करण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला धडा शिकवला जाईल."

"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या भारतविरोधी वक्तव्यांवर आता भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. चुकीच्या पावलाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.
भारताचा इशारा -
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी गुरुवारी (१४ ऑगस्ट २०२५) पत्रकार परिषदेत पाकिस्तानला थेट इशारा दिला. ते म्हणाले "पाकिस्तानकडून सातत्याने भारतविरोधी विधाने केली जात आहेत. युद्ध भडकवणारी विधाने केली जात आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी वारंवार भारतविरोधी विधाने करणे पाकिस्तानी नेतृत्वाची पद्धत आहे. पाकिस्तानला सल्ला आहे की, त्यांनी आपल्या विधानांवर सय्यम ठेवावा. कोणत्याती चुकीच्या धाडसाचा परिणाम वेदनादायक असेल."
शहबाज शरीफ यांनी दिली होती धमकी -
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची ही गंभीर प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विधानानंतर आली आहे. इस्लामाबादमध्ये मंगळवारी (12 ऑगस्ट, 2025) एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते, "जर आपण आमचे पाणी रोखण्याची धमकी द्याल, तर पाकिस्तानचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकणार नाही. जर भारताने असे काही करण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला धडा शिकवला जाईल." याशिवाय, पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणी रोखणे, ही युद्ध कारवाई मानली जाईल, असेही पाकिस्तानने वारंवार म्हटले आहे.
बिलावल भुट्टोपासून ते झरदारींपर्यंत, भारतविरोधी विधाने... -
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विधानापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी ते माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीही भारतविरोधी विधाने केली आहेत. त्यांनी सिंधू पाणी कराराच्या निलंबनाची तुलना, सिंधू संस्कृतीवरील हल्ल्याशी केली. एवढेच नाही, तर आपल्याला युद्धासाठी भाग पाडले गेले, तर पाकिस्तान मागे हटणार नाही, असेही ते म्हणाले होते.