"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 17:51 IST2025-12-20T17:51:13+5:302025-12-20T17:51:57+5:30
"काँग्रेसने ६-७ दशकांत केलेल्या चुका आता आपले सरकार एक-एक करून सुधारत आहे..."

"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (१९ डिसेंबर २०२५) आसाममधील गुवाहाटी येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला. "काँग्रेस सरकारच्या काळात आसाम आणि ईशान्य भारताचा विकास त्यांच्या अजेंड्यातच नव्हता, उलट आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचे कट कारस्थान रचले जात होते," असा खळबळजनक आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसच्या सरकारांमध्ये बसलेले लोक विचारायचे, आसाम आणि ईशान्येकडे जातंच कोण? आसाममध्ये आधुनिक विमानतळ, रेल्वे आणि हायवेची काय गरज आहे? असा विचार ते कायचे. याच संकुचित विचारामुळे काँग्रेसने अनेक दशके या संपूर्ण प्रदेशाची उपेक्षा केली. काँग्रेसने ६-७ दशकांत केलेल्या चुका आता आपले सरकार एक-एक करून सुधारत आहे."
मोदी पुढे म्हणाले, "माझ्यासाठी आसामचा विकास ही केवळ गरज नाही, तर एक जबाबदारी आणि उत्तरदायित्व आहे. गेल्या ११ वर्षांत ईशान्य भारतासाठी लाखो कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी झाल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारी नोकऱ्यांमधील भ्रष्टाचाराचा उल्लेख करताना ते म्हणाले, "काँग्रेसच्या काळात आसाममध्ये वशिल्याशिवाय (चिठ्ठी आणि खर्च) नोकरी मिळणे अशक्य होते, पण आज हजारो तरुणांना पारदर्शकपणे सरकारी नोकऱ्या मिळत आहेत."
हिंसाचाराकडून औद्योगिक विकासाकडे -
"ज्या भागात एकेकाळी हिंसाचार आणि रक्तपात व्हायचा, तेथे आज ४जी आणि ५जी तंत्रज्ञान पोहोचले आहे. ज्या जिल्ह्यांची ओळख हिंसाग्रस्त जिल्हे असा होता, ते जिल्हे आज आकांक्षी जिल्हे म्हणून ओळखले जात आहेत. भविष्यात हेच जिल्ह्ये 'इंडस्ट्रियल कॉरिडॉर' बनतील. आज ईशान्य भारताबाबत संपूर्ण देशात एक नवा विश्वास निर्माण झाला आहे," असेही मोदी म्हणाले.