काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 06:28 IST2025-12-28T06:27:08+5:302025-12-28T06:28:25+5:30
काँग्रेस कार्यकारिणीची दिल्लीमध्ये शनिवारी बैठक झाली. हा कायदा गरिबांना चिरडण्यासाठी आणण्यात आला आहे. त्याविरोधात आम्ही रस्त्यावर आणि संसदेत लढा देऊ, असा इशारा खरगे यांनी केंद्र सरकारला दिला.

काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
नवी दिल्ली : ग्रामीण रोजगारासाठी केलेला मनरेगा कायदा केंद्र सरकारने रद्दबातल केल्याच्या विरोधात काँग्रेस देशभरात ५ जानेवारीपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. मनरेगाचे अस्तित्व संपविल्यामुळे जनतेत प्रचंड संताप आहे. या निर्णयाचे परिणाम एनडीए सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही खरगे यांनी दिला.
काँग्रेस कार्यकारिणीची दिल्लीमध्ये शनिवारी बैठक झाली. हा कायदा गरिबांना चिरडण्यासाठी आणण्यात आला आहे. त्याविरोधात आम्ही रस्त्यावर आणि संसदेत लढा देऊ, असा इशारा खरगे यांनी केंद्र सरकारला दिला.
‘मनरेगा रद्द करणे हा गांधीजींचा अपमान’ : जनतेच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला अखेर तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले, तशीच तीव्र प्रतिक्रिया मनरेगाच्या निर्णयाविरोधात जनतेने आंदोलन करून व्यक्त करावी, मनरेगा रद्द करणे हा महात्मा गांधींचा अपमान आहे, असाही आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
‘नोटाबंदीप्रमाणेच गरिबांवर हल्ला’
नोटाबंदीप्रमाणेच मनरेगा रद्दबातल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा गरिबांवर व राज्यांवर केलेला विनाशकारी हल्ला आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या शनिवारी केली.
एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मनरेगा रद्द करण्याबाबत विरोधक व केंद्रीय मंत्रिमंडळाशी चर्चा न करता एकहाती निर्णय घेण्यात आला. मनरेगाचे अस्तित्व संपविण्यात आले.
यूपीएच्या केंद्र सरकारने लागू केलेली मनरेगा ही केवळ रोजगार योजना नसून जगभरात कौतुक झालेली विकास योजना आहे.