तुफान राडा! सोनिया गांधींच्या बर्थडे केकवरून काँग्रेस कार्यकर्ते भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:12 IST2025-12-11T19:11:59+5:302025-12-11T19:12:44+5:30
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील बुढाणा गेट येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात मंगळवारी मोठा गदारोळ झाला. पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडले.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील बुढाणा गेट येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात मंगळवारी मोठा गदारोळ झाला. पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडले. त्यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. हे संपूर्ण प्रकरण सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यावरून सुरू झालं आणि बघता बघता कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान काही कार्यकर्ते सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक घेऊन आले आणि तो कापण्याची तयारी करू लागले. त्याचवेळी, तेथे उपस्थित असलेल्या काही अन्य कार्यकर्त्यांनी याला विरोध केला. विरोधानंतर दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली, पुढे तो वाद टोकाला गेला.
काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रदीप निरवाल, जिल्हाध्यक्ष गौरव भाटी आणि महानगर अध्यक्ष रंजन शर्मा हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. असं सांगितलं जात आहे की, राष्ट्रीय सचिवांना पोहोचायला थोडा उशीर झाला होता. याच दरम्यान, शहर समितीच्या काही लोकांनी कार्यक्रमाला सुरुवात केली होती. याच गोष्टीवरून काही कार्यकर्ते नाराज झाले आणि वाद वाढला.
परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून उपस्थित ज्येष्ठ नेत्यांनी त्वरित हस्तक्षेप केला आणि सर्व कार्यकर्त्यांना शांत केलं. वाद मिटल्यानंतर बैठक शांततेत पार पडली. या घटनेनंतर काँग्रेस कार्यालयात अंतर्गत मतभेद आणि शिस्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हे प्रकरण आता संपले आहे आणि सर्वांना पक्षाच्या अनुशासनात राहून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.